नेदरलँड्सवर मात; पुरुषांमध्ये भारताचा युक्रेनविरुद्ध पराभव

भारताच्या महिलांनी नेदरलँड्सवर  ३-१ अशी मात करीत बुद्धिबळ ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांच्या आशा कायम राखल्या. पुरुष गटात भारताला युक्रेनने २.५-१.५ असे हरविले.

महिला गटात भारताचे १४ गुण झाले असून नवव्या फेरीअखेर त्यांना पाचवे स्थान मिळाले आहे. भारताच्या द्रोणावली हरिकाने नेदरलँड्सच्या वेंग झाओकिनला पराभूत करीत १-० अशी आघाडी घेतली. मात्र पुढच्या लढतीत पद्मिनी राऊतला अ‍ॅनी हेस्टकडून पराभव स्वीकारावा लागला. तथापि तानिया सचदेवने अ‍ॅना कॅझेरीनवर मात करीत पुन्हा भारताला आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ सौम्या स्वामीनाथनने माईके बीटमनचा पराभव करीत भारताचा ३-१ असा विजय निश्चित केला. चीनने सोळा गुणांसह आघाडीस्थान मिळविले आहे. पोलंडने १५ गुणांसह दुसरे स्थान घेतले आहे.

पुरुषांमध्ये भारताचे १४ गुण असून त्यांची सहाव्या क्रमांकावर घसरण झाली. भारताच्या पी. हरिकृष्णला युक्रेनच्या पॉवेल एल्जानोवने बरोबरीत रोखले. पाठोपाठ भारताच्या बी. अधीबन व विदित गुजराथी यांनाही अनुक्रमे रुझलान पोनोमारिओ व युरियू क्रिवोदचेन्को यांच्याविरुद्धचा डाव बरोबरीत ठेवावा लागला. भारताच्या एस.पी. सेतूरामनने आठव्या फेरीत इंग्लंडच्या निगेल शॉर्ट याच्यावर सनसनाटी विजय मिळविला होता मात्र युक्रेनच्या अन्तोन बोरोबोव्ह याच्यापुढे त्याचा निभाव लागला नाही. या विभागात अमेरिका व युक्रेन यांचे प्रत्येकी सोळा गुण झाले असून टायब्रेकर गुणांकनाच्या आधारे ते अनुक्रमे पहिल्या दोन क्रमांकावर आहेत.