इंग्लंडचा विजय; मालिकेत १-० ने आघाडी

रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्या सामन्यात यजमानांकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. या विजयामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारतीय महिला खेळाडूंनी सामन्यात दमदार सुरुवात केली. सातव्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात त्यांना अपयश आले. पहिल्या सत्रात भारताने यजमानांवर दबाव निर्माण केला. वंदना कटारियाने चेंडू प्रतिस्पर्धीच्या गोलजाळीत टाकला, परंतु घातक रित्या तिने हॉकी स्टीक फिरवल्यामुळे सामनाधिकाऱ्यांनी हा गोल अमान्य केला. दुसऱ्या सत्रातही भारताचे दबावतंत्र कायम होते. रितूने जवळपास भारताला आघाडी मिळवून दिलीच होती. मात्र, इंग्लंडच्या गोलरक्षकाने तिचा प्रयत्न हाणून पाडला. इंग्लंडनेही संघर्ष केला, परंतु मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्यच राहिला. तिसऱ्या सत्रात एलीई रायरने (३८ मि.) गोल करत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून देताना भारताच्या दबावाची धार बोथट केली.

तिसरे सत्र संपूर्णपणे इंग्लंडच्या पारडय़ात होते. चौथ्या सत्रात भारतीय खेळाडूंकडून बरोबरी साधण्याचा आतोनात प्रयत्न झाला. सामना संपायला अवघे तीन मिनिटे शिल्लक असताना रायरने पेनल्टीवर दुसऱ्या गोलची नोंद करत इंग्लंडचा २-० असा विजय निश्चित केला.