उपांत्य फेरीत चीनविरुद्ध पराभूत झाल्याने आव्हान संपुष्टात
बलाढय़ चीनविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारतीय महिला संघाला उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले. गुरुवारी भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत धडक मारत कांस्य पदक पक्के केले होते. पदकाचा रंग सुधारण्याची संधी महिला संघाला होती. मात्र चीनच्या झंझावातासमोर भारताने शरणागती पत्करली. दोन वर्षांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या उबेर चषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रथमच पदकाची कमाई केली होती. महिला संघाने पदकाची ही परंपरा कायम राखली.
सलामीच्या लढतीत ली झेरुईने सायनावर २१-१५, १२-२१, २१-१७ असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर सायनाने दुसऱ्या गेममध्ये झेरुईला चुका करण्यास भाग पाडले. झेरुईच्या स्वैर खेळाचा फायदा उठवत सायनाने दुसरा गेम नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये १३-१३ अशी बरोबरीची स्थिती होती. मात्र त्यानंतर झेरुईने बॉडीलाइन स्मॅश, क्रॉसकोर्ट, ड्रॉप अशा भात्यातली फटक्यांचा प्रभावीपणे उपयोग करत सायनाला निष्प्रभ केले. झेरुईविरुद्धचा सायनाचा हा सलग आठवा पराभव आहे. २०१२ मध्ये इंडोनेशिया स्पर्धेत सायनाने झेरुईला नमवण्याची किमया केली होती. झेरुईच्या विजयासह चीनने १-० असे खाते उघडले.

एकेरीच्या दुसऱ्या लढतीत सिझियान वांगने पी.व्ही. सिंधूवर २१-१३, २३-२१ अशी मात केली. सिझियानकडून सिंधूचा हा चौथा पराभव आहे. पहिल्या गेममध्ये ३-३ बरोबरीनंतर सिझियानच्या आक्रमक खेळासमोर सिंधू कमकुवत ठरली. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने लौकिकाला साजेसा खेळ करीत सिझियानला टक्कर दिली. सिंधूकडे १८-८ अशी भक्कम आघाडी होती. मात्र सिझियानने झुंजार खेळ करीत २०-२० अशी बरोबरी केली. उर्वरित एका गुणाची कमाई करीत सिझियानने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.