भारतीय महिला कबड्डी संघाने अंतिम लढतीत यजमान थायलंडला ६१-२८ असे पराभूत करून आशियाई समुद्रकिनारी (बीच) क्रीडा स्पध्रेत सुवर्णपदकाची कमाई केली. भारतीय पुरुषांना मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय महिला संघाने पूर्वार्धात ३४-१३ अशी आघाडी घेतली होती, मग उत्तरार्धातही आपले वर्चस्व टिकवत जेतेपदावर नाव कोरले. ममता पुजारीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात प्रियांका, रणदीप कौर, काकोली बिस्वास, पायेल चौधरी आणि परमेश्वरी अंबालावानान यांचा समावेश होता.
शनिवारी भारतीय पुरुष संघाने २८-३९ अशा फरकाने पाकिस्तानकडून हार पत्करली. इन्चॉनला झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताला तोलामोलाची टक्कर देणाऱ्या इराणने अंतिम फेरीत पाकिस्तानला ४०-२७ असे हरवले आणि सुवर्णपदकावर नाव कोरले.
भारत २०व्या स्थानावर
या स्पध्रेत १० पदके (२ सुवर्ण, १ रौप्य, ७ कांस्य) जिंकणाऱ्या भारताला पदकतालिकेत २०व्या स्थानावर समाधान मानावे लागले. याआधी हरिंदर पाल संधूने स्क्वॉश एकेरीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. यजमान थायलंडने सर्वाधिक १२६ पदके (५६ सुवर्ण, ३ रौप्य, ३३ कांस्य) जिंकत पदकतालिकेत अग्रस्थान पटकावले. चीनला दुसरे, तर दक्षिण कोरियाला तिसरे स्थान मिळाले.