पाच महिला बॉक्सिंगपटू उपांत्यपूर्व फेरीत

भारतीय महिला बॉक्सिंगपटूंनी एआयबीए जागतिक युवा्र अजिंक्यपद स्पध्रेचा मंगळवारचा दिवस गाजवला. अंकुशिता बोरोसह (६४ किलो), शशी चोप्रा (५७ किलो), नीतू (४८ किलो), साक्षी चौधरी (५४ किलो) आणि ज्योती गुलिया (५१ किलो) या भारतीय खेळाडूंनी विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

बोरोने टर्कीच्या सॅग्ला अ‍ॅलूक कॅग्लाविरुद्ध आक्रमक खेळ करताना सहज विजय मिळवला. बाल्कन युवा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पध्रेत रौप्यपदक विजेत्या बोरोसमोर प्रतिस्पर्धी खेळाडूला अधिक काळ तग धरता आला नाही. ‘कॅग्लाने तिच्या देशात मला पराभूत केले होते आणि स्वाभाविकच त्याची परतफेड माझ्याकडून होणे आवश्यक होते. ती मी मायदेशात केली,’ असे बोरो म्हणाली. गुलियाने युक्रेनच्या अनास्तासिया लिसिंस्कावर, तर चोप्राने दुसऱ्या मानांकित तैवानच्या लीन ली वेई-यीवर विजय मिळवला. बाल्कन युवा आंतरराष्ट्रीय स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या नीतूने ४८ किलो वजनी गटात बल्गेरियाच्या एमी-मेरी तोडोरोव्हावर मात केली. ती म्हणाली, ‘हा माझ्यासाठी सोपा सामना होता. बल्गेरियात मी यापूर्वी तोडोरोव्हावर विजय मिळवला होता आणि तिचा खेळ माझ्या ठाऊक होता.’

अखेरच्या लढतीत चौधरीने चौथ्या मानांकित रशियाच्या इंदिरा शुडाबाएव्हावर विजय मिळवत आगेकूच केली. नेहा यादव (८१ किलोवरील) आणि अनुपमा (८१ किलो) यांना थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाल्याने भारताची दोन पदके निश्चित झाली आहेत. या स्पध्रेत ३८ देशांतील १५०हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. पहिल्यांदाच भारतात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.