जपानकडून ५-० असा मानहानीकारक पराभव

उबेर चषकात जपानविरुद्धच्या लढतीत सायनासह सर्व महिला बॅडमिंटनपटू सपशेल अपयशी ठरल्याने भारताला ५-० असा मानहानीकारक पराभव स्वीकारावा  लागला. त्यामुळे पुरुषांपाठोपाठ महिलांचेही आव्हान संपुष्टात आले.

थॉमस – उबेर चषकात गतवर्षी दोन कांस्यपदक पटकावणाऱ्या भारतीय संघातील पुरुष गटापाठोपाठ महिलांनादेखील रिकाम्या हाताने माघारी परतावे लागणार आहे. यंदा भारतीय संघात पी.व्ही. सिंधू तसेच दुहेरीतील प्रमुख खेळाडू अश्विनी पोनप्पाचा समावेश नसल्याचा फटका संघाला सहन करावा लागला. जपानशी झालेल्या लढतींमध्ये सायना नेहवालसह एकाही खेळाडूला विजय मिळवता आला नाही. जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेल्या अकाने यामागुचीशी झुंजताना सायनाने अत्यंत प्रभावी खेळ करत पहिल्या गेममध्ये चांगली लढत दिली. मात्र, तो गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये उसळी मारत सायनाने तो सहजपणे जिंकला. परंतु तिसऱ्या गेममध्ये पुन्हा रंगलेल्या चुरशीच्या डावात यामागुचीने सायनावर मात करीत जपानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुहेरीत संयोगिता घोरपडे व प्राजक्ता सावंत आणि एकेरीत वैष्णवी रेड्डी जक्का यांनी आपापले सामने दोन गेममध्येच गमावले. वैष्णवीपुढे तर जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या नोझोमी ओकुहाराचे आव्हान असल्याने तिला ते अजिबातच पेलवले नाही. हा सामना अवघ्या २६ मिनिटांमध्ये संपुष्टात आला. त्यामुळे प्रारंभीच्या ३ सामन्यांतच जपानने ३-० अशी विजयी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुहेरीच्या दुसऱ्या सामन्यात वैष्णवी भाले आणि मेघना जक्कामपुडीनेदेखील सपशेल शरणागती पत्करली. अखेरच्या एकेरी सामन्यात अरुणा प्रभुदेसाईने दोनच गेममध्ये पराभव स्वीकारला.