पूनम यादवची प्रभावी फिरकी; हरमनप्रीत, जेमिमा यांची उपयुक्त खेळी

बेंगळूरु : कर्णधार हरमनप्रीत कौर व युवा जेमिमा रॉड्रिग्ज यांनी केलेली धडाकेबाज खेळी व गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने पाचव्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा ५१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने ४-० अशा फरकाने मालिका जिंकली. मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधना (०) व मिताली राज (१२) यांनी निराशा केली. मात्र त्यानंतर जेमिमा (४६) आणि हरमनप्रीत (६३) यांनी भारताचा डाव सावरला. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचली. मात्र या दोघी बाद झाल्यावर भारताचा डाव गडगडला व संपूर्ण डाव अवघ्या १८.३ षटकांत १५६ धावांवर संपुष्टात आला. श्रीलंकेच्या हंसिका सिरीवर्दनेने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

प्रत्युत्तरात, भारतीय फिरकीपटू दीप्ती शर्मा आणि पूनम यादव यांच्यापुढे श्रीलंकन फलंदाजांची भंबेरी उडाली. अनुष्का संजीवनी (२९) व सिरीवर्दने (२२) वगळता एकही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही. त्यामुळे श्रीलंकेचा डाव १७.४ षटकांत १०५ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले.

संक्षिप्त धावफलक

भारत : १८.३ षटकांत सर्वबाद १५६ (हरमनप्रीत कौर ६३, जेमिमा रॉड्रिग्ज ४६; हंसिका सिरीवर्दने ३/१९) विजयी वि.

श्रीलंका : १७.४ षटकांत सर्वबाद १०५ (अनुष्का संजीवनी २९, हंसिका सिरीवर्दने २२; पूनम यादव ३/१८, दीप्ती शर्मा २/१८).