भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय मालिकेतील फॉर्म कायम राखताना ट्वेन्टी-२० मालिकेत विजयी सलामी दिली. मंगळवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ७ विकेट राखून दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला.

यजमान आफ्रिकेच्या १६४ धावांचे लक्ष्य १८.५ षटकांत ३ बळींच्या मोबदल्यात सहज पार केले. कर्णधार मिताली राजने नाबाद अर्धशतकी खेळी केली, तर मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मानधना आणि वेदा कृष्णमूर्ती यांनी उपयुक्त खेळी करीत विजयात हातभार लावला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय महिलांनी झटपट क्रिकेटकडे मोर्चा वळवला. पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकून मितालीने यजमानांना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीला फलंदाजीला आलेल्या लिझली ली हिला शिखा पांडेने पाचव्या षटकात तंबूची वाट दाखवली. त्यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. कर्णधार डॅन व्हॅन लिएकर्क आणि मिग्नन डय़ु प्रिझ व च्लोए ट्रायन यांनी छोटेखानी खेळी करीत संघाला १६४ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला.

प्रत्युत्तरात मिताली आणि मानधना यांनी भारताला आश्वासक सुरुवात करून दिली. मानधना बाद झाल्यानंतर मितालीने जेमिमा आणि वेदासह भारताला विजय मिळवून दिला. मितालीने ४८ चेंडूंत ६ चौकार आणि एक षटकार लगावत नाबाद ५४ धावा केल्या. वेदाने षटकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : ४ बाद १६४ (डॅन व्हॅन लिएकर्क ३८, च्लोए ट्रायन नाबाद ३२; अनुजा पाटील २/२३) पराभूत वि. भारत : १८.५ षटकांत ३ बाद १६८ (मिताली राज नाबाद ५४, स्मृती मानधना २८, जेमिमा रॉड्रिग्ज ३७, वेदा कृष्णमूर्ती नाबाद ३७).

मिताली राज

  • धावा ५४*
  • चेंडू ४८
  • चौकार ६
  • षटकार १