करोना व्हायरसच्या भीषण अवस्थेमुळे काही क्रिकेटपटूंनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. अशातच क्रिकेटविश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय महिला संघाची खेळाडू प्रिया पुनिया हिच्या आईचे करोनामुळे निधन झाले आहे. पूनियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली.

”आज मला समजले, की तू मला बलवान रहायला का सांगत होतीस. तुला गमावल्यावनंतर होणारे नुकसान पचवण्याची शक्ती मला मिळावी, हे तुला माहीत होते. आई, तुझी आठवण येतेय. अंतराने फरक पडत नाही. मला माहित आहे की तू नेहमी माझ्याबरोबर आहेस. जीवनातील काही सत्य स्वीकारणे कठीण आहे. तुझ्या आठवणी कधीही विसरल्या जाणार नाहीत”, असे पुनियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Punia (@priyapunia16)

प्रिया पुनियाने या घटनेनंतर लोकांना पूर्ण काळजी घ्यायला सांगितले आहे. करोना एक धोकादायक व्हायरस असून सामाजिक अंतराचे पालन करा आणि मास्क घाला, असे तिने सांगितले. काही दिवसांपूर्वी भारतीय महिला संघातील आणखी एक खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिने तिची आई आणि बहीण दोघांनाही करोना विषाणूमुळे गमावले.

क्रिकेटविश्वातही करोनाचे थैमान

भारतात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाच्या वडिलांचे करोनामुळे निधन झाले. त्यानंतर भारतीय लेगस्पिनर पीयूष चावला याच्याही वडिलांना करोनामुळे जीव गमवावा लागला. भारतीय खेळाडू रुद्रप्रताप सिंह (आर. पी. ​​सिंह) याच्यावरही दु: खाचा डोंगर कोसळला. आर. पी. ​​सिंहच्या वडिलांचे करोनामुळे निधन झाले.