स्पेन दौऱ्यातील अखेरच्या हॉकी सामन्यात दमदार कामगिरी

भारतीय महिलांच्या हॉकी संघाने स्पेन दौऱ्याची सांगता करताना विश्वचषक उपविजेत्या आयर्लंड संघाला ३-० असे नमवत दमदार कामगिरीची नोंद केली.

भारताने आयर्लंडशी शनिवारी झालेल्या सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली होती, तर रविवारी मोठय़ा फरकाने विजय मिळवण्यात भारताला यश मिळाले. भारताच्या आक्रमक फळीने आयर्लंडवर प्रारंभापासूनच धारदार आक्रमणे केली. त्या दबावामुळेच भारताच्या नवजोत कौरला १३व्या मिनिटाला पहिला गोल करता आला. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला. मग पहिल्या सत्रानंतरदेखील भारताने हल्ले-प्रतिहल्ले कायम राखत आयर्लंडवर दडपण आणले. दुसऱ्या सत्रात आयर्लंडच्या संघाला मिळालेला एक पेनल्टी कॉर्नरदेखील भारतीय बचावफळीने सफल होऊ दिला नाही.

दुसऱ्या सत्रात रिना खोकरने दीप ग्रेस एक्काच्या पासवर चपळाईने गोल करीत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. भारतीय संघ अत्यंत शिस्तबद्ध खेळासह आक्रमण आणि बचाव करीत होता. मात्र मध्यंतरानंतरच्या तिसऱ्या सत्रात आयर्लंडच्या महिलांना पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली; परंतु भारतीय बचावपटूंनी त्यांचा दुसरा प्रयत्नदेखील व्यर्थ ठरवला. अखेरच्या सत्रात दोन्ही बाजूंनी धारदार आक्रमणे झाली. त्यात गुरजित कौरने पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल साकारत भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. गुरजितने या दौऱ्यात सर्वाधिक गोल केले. यापूर्वी भारताने स्पेनविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली होती.

भारतीय संघ नऊ दिवसांमध्ये सहा सामने खेळला असून असे सलग सामने खेळणे खूप अवघड असते. मागील दोन सामने तर या खेळाडूंनी कर्णधार राणी रामपालच्या अनुपस्थितीत खेळले आहेत. त्यात एका सामन्यात बरोबरी आणि दुसऱ्यात मोठा विजय मिळवल्याने मला संघाचा अभिमान वाटतो. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पूर्ण वेळ भारतीय संघाचेच वर्चस्व होते. या दौऱ्यात आम्ही वैयक्तिक नेतृत्वगुण आणि जबाबदारी घेण्याची कला आत्मसात केल्याने अधिक आनंद वाटतो आहे.   – शोर्ड मरिन, भारतीय संघाचे प्रशिक्षक