भारत-द. कोरिया  हॉकी मालिका

भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा ३-१ असा पराभव केला आणि या दोन संघांमधील पाच कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी मिळवली.

सुरुवातीपासून आक्रमक खेळ करणाऱ्या भारताकडून गुरजित कौरने दुसऱ्या, तर दीपिकाने १४व्या मिनिटाला गोल करीत संघाची बाजू भक्कम केली. सामन्याच्या ४७व्या मिनिटाला पूनम राणीने संघाचा आणखी एक गोल नोंदवला. शेवटची तीन मिनिटे बाकी असताना कोरियाच्या मिहुआन पार्कने गोल केला आणि सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र नंतर त्यांना गोल नोंदवता आला नाही.

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला भारतास पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत गुरजितने कोरियन गोलरक्षक हेबिन जुंगला चकवत गोल केला. त्यानंतर दोन मिनिटांनी कोरियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र त्याचा फायदा घेण्यात त्यांना यश मिळाले नाही. पुन्हा १०व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र भारताची गोलरक्षक स्वाती कुमारीने अप्रतिम गोलरक्षण करीत त्यांना या संधीपासून वंचित ठेवले. दुसऱ्या बाजूने भारताने आक्रमक चाली कायम ठेवल्या. त्यामध्ये १४व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर दीपिका हिने अचूक फटका मारून गोल तटवला.

सामन्याच्या उत्तरार्धात दोन्ही संघांनी वेगवान चाली केल्या, मात्र गोल करण्यात त्यांना यश मिळत नव्हते. अखेर ४७व्या मिनिटाला पूनम राणीने गोल करत संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. बराच वेळ त्यांनी ही आघाडी टिकवली होती. ५७व्या मिनिटाला मिहुआनने गोल केला आणि भारताची आघाडी कमी केली. भारताने ३-१ अशी आघाडी कायम ठेवत सामना जिंकला.