गतविजेच्या भारतीय महिला हॉकी संघाने, आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत पुन्हा एकदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. मलेशियाविरुद्ध सामन्यात ३-२ अशी बाजी मारत भारतीय महिला संघाने आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. याआधीच्या सामन्यांमध्ये भारतीय महिलांनी जपानच्या महिलांवर ४-१, तर चीनच्या संघावर ३-१ अशी मात केली होती. सध्या ९ गुणांसह भारतीय महिला पहिल्या स्थानावर असून, साखळी फेरीत भारतीय महिलांची यजमान कोरियाच्या संघाशी गाठ पडणार आहे.

गुरजित कौर (१७ वे मिनीट), वंदना कटारिया (३३ वे मिनीट) आणि लारेमिसामी (४० वे मिनीट) या तिन्ही खेळाडूंनी भारताकडून गोल झळकावले. मलेशियाकडून नुरानी राशिद आणि हनिस ओनने गोल झळकावले. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं. मात्र दुसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंनी दमदार पुनरागमन करत सामन्यात आघाडी घेतली. यानंतर मलेशियाच्या खेळाडूंनी सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय महिलांच्या भक्कम बचावापुढे त्यांची डाळ शिजू शकली नाही.