जकार्ता : कझाकिस्तानसारख्या कमकुवत संघाविरुद्ध भारतीय महिला हॉकी संघाचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ होती. फक्त किती गोलांनी ते जिंकतात हीच उत्सुकता होती. भारताने हा सामना २१-० असा जिंकून लागोपाठ दुसरा विजय मिळविला.

एकतर्फी झालेल्या लढतीत भारताने पूर्वार्धात ९-० अशी मोठी आघाडी घेतली होती. भारताकडून लिलिमा मिंझ (२८ वे, ३७ वे, ४४ वे मिनिट), गुरजित कौर (६ वे, ३५ वे, ४३ वे, ५१ वे मिनिट), नवनीत कौर (११ वे, १२ वे, ४९ वे मिनिट), लालरेम सिआमी (९ वे, १९ वे, २९ वे मिनिट), नेहा गोयल (१० वे मिनिट), नवज्योत कौर (१६ वे, ५३ वे मिनिट), उदिता दत्ता (३२ वे मिनिट), वंदना कटारिया (३६ वे, ५२ वे मिनिट), दीपग्रेस एक्का (४२ वे मिनिट), मोनिका (५४ वे मिनिट) यांनी गोल केले.

सामन्याच्या प्रारंभापासूनच भारतीय खेळाडूंनी खेळावर संपूर्ण नियंत्रण मिळविले. भारतीय खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट सांघिक व आक्रमक खेळापुढे कझाकिस्तानचा बचाव साफ कोलमडला होता. त्यातच त्यांच्या खेळाडूंनी दांडगाईचा खेळ करीत भारताच्या विजयास हातभार लावला.

भारताने पहिल्या सामन्यात इंडोनेशियाचा ८-० असा दणदणीत पराभव केला होता. साखळी ‘ब’ गटात भारताने सहा गुणांसह आघाडी स्थान मिळविले आहे.