दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही वर्चस्व राखण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज झाला आहे. पहिला ट्वेन्टी-२० क्रिकेट सामना भारताने जिंकला आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्याला सामोरे जाताना विजयी घोडदौड कायम कशी राखता येईल, यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत भारताने दक्षिण आफ्रिकेला १६४ धावांवर रोखले होते. त्यानंतर हे आव्हान भारताने १८.५ षटकांत पूर्ण केले होते. या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने अर्धशतक झळकावले होते, तर जेमिमा रॉड्रिग्ज आणि वेदा कृष्णमूर्ती यांच्याबरोबर उपयुक्त भागीदारीही रचली होती. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दक्षिण आफ्रिकेपेक्षा उजवी ठरली आहे, त्यांनी जर कामगिरीत सातत्य राखले तर ट्वेन्टी-२० मालिका जिंकणे त्यांच्यासाठी अवघड नसेल.