भारत- दक्षिण कोरिया   महिला हॉकी मालिका

जिनचीऑन (कोरिया) : मालिका आधीच खिशात घालणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघाला तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला. यजमान दक्षिण कोरियाने हा सामना ४-० अशा फरकाने जिंकला. परंतु तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला.

भारताचा बचाव या सामन्यात मोठय़ा दडपणाखाली जाणवला. त्यामुळे कोरियाच्या आक्रमकांनी जोरदार हल्ले केले. कोरियाने या सामन्यात पाच पेनल्टी कॉर्नर्स मिळवले. यापैकी २९व्या मिनिटाला एकाचे गोलमध्ये रूपांतरण केले. जँग हीसानने कोरियाचे खाते उघडले.

मग ४१व्या मिनिटाला किम ह्युंजी आणि कँग जिना यांना लागोपाठ गोल करीत कोरियाची आघाडी वाढवली. ५३व्या मिनिटाला ली युरीने चौथा गोल साकारला.‘‘भारतीय संघ अखेपर्यंत या सामन्यात सावरू शकला नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, आम्ही या अनुभवातून काहीच शिकलो नाही. कामगिरीतील चढउतारांतून शिकण्यासारखे बरेच असते,’’ असे भारताचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी सांगितले.