भारतीय महिला संघाने विश्व टेबल टेनिस अजिंक्यपद स्पध्रेतील दुसऱ्या विभागाच्या शेवटच्या साखळी सामन्यात क्रोएशियावर ३-० असा विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला.

मनिका बात्राने दमदार खेळ करताना ली राकोव्हावर ११-८, १२-१०, ८-११, ११-६ असा विजय मिळवला. अनुभवी खेळाडू मौमा दासला मात्र युआन टिएनविरुद्ध संघर्ष करावा लागला. मौमाने १३-११, ९-११, ११-८, ११-२ अशा फरकाने बाजी मारली. के. शामिनीने इव्हाना तुबिकॅनेसचा १४-१२, ११-८, ७-११, ११-३ असा पराभव केला.

दुसरीकडे  भारतीय पुरुष संघाने चौथ्या फेरीत स्वित्र्झलडचा ३-० असा पराभव केला. सौम्यजित घोषने ११-८, ११-७, ८-११, ११-३ अशा फरकाने एलिआ शुमिडचा पराभव करून भारताला आघाडी मिळवून दिली.

त्यानंतर अचंता शरथ आणि जी. साथियन यांनी आपापल्या लढती जिंकल्या. शरथने लिओनेल वेबरचा ११-७, ११-७, ११-७ असा, तर साथियनने निकोलस चॅम्पोडचा ११-७, ११-५, ११-३ असा पराभव केला.