भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या व अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात श्रीलंकेवर नऊ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला व मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने २० षटकांत ९ बाद ८९ धावा केल्या. त्यानंतर भारताने फक्त १३.५ षटकांत हे आव्हान पार केले. श्रीलंकेकडून इशानी लोकुसुरियागे (नाबाद २५), चामारी अटापटू (२१), अमा कांचना (१७) व निपुनी हंसिका (१३) अशा फक्त चौघींना दुहेरी आकडय़ात धावा काढता आल्या. एकता बिश्तने १७ धावांत ३ बळी घेतले, तर अनुजा पाटीलने १९ धावांत २ बळी मिळवले.

त्यानंतर स्मृती मंधानाने जबाबदारीने खेळत ४३ चेंडूंत पाच चौकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. वेल्लास्वामी वनिताने३४ धावा केल्या. या जोडीने ५२ चेंडूंत ६४ धावांची सलामी देत विजयाची पायाभरणी केली. मग स्मृतीने वेदा कृष्णमूर्तीच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : २० षटकांत ९ बाद ८९ (इशानी लोकुसुरियागे नाबाद २५; एकता बिश्त ३/१७) पराभूत वि. भारत : १३.५ षटकांत १ बाद ९१ (स्मृती मंधाना नाबाद ४३, वेल्लास्वामी वनिता ३४; चामारी अटापटू १/१९)