उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या भारताचा आज श्रीलंकेशी अखेरचा साखळी सामना

मेलबर्न : सलग तीन सामन्यांत यश संपादन करून दिमाखात उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय संघापुढे शनिवारी फलंदाजीतील त्रुटी सुधारण्याची अखेरची संधी आहे. महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील ‘अ’ गटाच्या शेवटच्या साखळी लढतीत भारताची श्रीलंकेशी गाठ पडणार आहे.

कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गतविजेत्या ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांना पराभूत करून सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठण्याचा मान मिळवला. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध भारताने अनुक्रमे १७ आणि १८ धावांनी विजय मिळवला, तर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत भारताने चार धावांनी सरशी साधली. परंतु अखेरची लढत गमावल्यास त्यांना गटातील अग्रस्थान टिकवता येणार नाही.

सलामीवीर शफाली वर्माने (३ सामन्यांत ११४ धावा) भारतातर्फे आतापर्यंत या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या असून पुन्हा एकदा तिच्या आक्रमक फलंदाजीवरच भारताची भिस्त असेल. मात्र शफालीवगळता अन्य फलंदाजांना सातत्याने योगदान देता आलेले नाही. विशेषत: हरमनप्रीत, स्मृती मानधना आणि वेदा कृष्णमूर्ती यांसारख्या अनुभवी खेळाडूंना उपांत्य फेरीपूर्वी लय मिळवण्याची ही अखेरची संधी आहे.

गोलंदाजीत अपेक्षेप्रमाणे फिरकीपटू पूनम यादव (३ सामन्यांत ८ बळी) समर्थपणे भारताचे नेतृत्व करत आहे. तिला राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि शिखा पांडे यांची उत्तम साथ लाभत आहे. त्यामुळेच आतापर्यंतचे तीनही सामने भारताने गोलंदाजीच्या बळावर जिंकले.

दुसरीकडे चामरी अटापटूच्या श्रीलंकेला अद्याप पहिले दोन्ही सामने गमवावे लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. परंतु धक्कादायक कामगिरीच्या बळावर ते भारतीय संघाला धूळ चारू शकतात. चामरीच्या फलंदाजीवर श्रीलंकेची सर्वाधिक मदार आहे.

श्रीलंकेला कमी लेखणार नाही – हरमनप्रीत

भारतीय संघाने सर्वप्रथम उपांत्य फेरी गाठली असली तरी, अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेला कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही, अशी प्रतिक्रिया भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केली.

३० वर्षीय हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत सलग तीन सामने जिंकले असले तरी हरमनप्रीतला मात्र अद्यापही लौकिकाला साजेशी कामगिरी करणे जमलेले नाही. परंतु हरमनप्रीतने याकडे फारसे लक्ष न देण्याचे सुचवले.

‘‘आम्ही उपांत्य फेरी गाठली असल्याचे मला ठाऊक आहे. परंतु श्रीलंकेविरुद्धचा सामनाही आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे गाफील राहून त्यांना कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही,’’ असे हरमनप्रीत म्हणाली.

‘‘वैयक्तिक पातळीवर मला संघासाठी पुरेसे योगदान देता येत नसल्याची खंत आहे. परंतु लवकरच मी संघाच्या विजयात मी मोलाची भूमिका बजावेन,’’ असेही हरमनप्रीतने सांगितले.

संघ

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), शफाली वर्मा, स्मृती मानधना, तानिया भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, पूनम यादव, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकार.

श्रीलंका : चामरी अटापटू (कर्णधार), हर्षिता माधवी, नीलाक्षी डी सिल्व्हा, कविशा दिलहारी, अमा कांचना, हंसिमा करुणारत्ने, अचिनी कुलासुरिया, सुगंदिका कुमारी, हसिनी परेरा, उदेशिका प्रबोधिनी, साथ्य संदीपनी, अनुष्का संजीवनी, शशिकला सिरीवर्दने, दिलानी मनोदरला, उमेशा थिमाशिनी.

* सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वा. ल्ल थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २

शफाली वर्माला T ट्वेन्टी-२० विश्वचषकात सलग तिसऱ्यांदा सामनावीर पुरस्कार पटकावणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरण्याची संधी आहे. तिने बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.

सलग दुसऱ्या विश्वचषकात भारताला गटातील चारही सामने जिंकण्याची संधी आहे. २०१८ मध्येसुद्धा भारताने ‘ब’ गटात विजयी चौकार लगावून अग्रस्थान मिळवले होते.