स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्या अर्धशतकी खेळीनंतर पूनम यादवच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर १०७ धावांनी विजय मिळवला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ६ बाद २४५ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेला श्रीलंकेचा संपूर्ण संघ १३८ धावांत माघारी परतला.
मंधाना आणि कौर यांच्यासह कर्णधार मिताली राजने ४९ धावांची खेळी करून विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. मंधानाने ८१ चेंडूंत ८ चौकारांसह ५५ धावा केल्या. मंधाना बाद झाल्यानंतर कौरने सामन्याची सूत्रे हातात घेत ६१ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून ५० धावा केल्या. मितालीनेही ७४ चेंडूंत ४९ धावा केल्या. त्यात पाच चौकारांचा समावेश आहे. २४६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची त्रेधा उडाली. प्रसादनी वीराकोडीने ११३ चेंडूंत ७ चौकारांसह ६९ धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. पूनम यादवने सर्वाधिक चार बळी टिपले.

संक्षिप्त धावफलक
भारत : ६ बाद २४५ (स्मृती मंधाना ५५, हरमनप्रीत कौर ५०; शशिकला श्रीवर्धने २-३१) विजयी वि. ४५.२ षटकांत १३८ (प्रसादनी विरकोडी ६९, पूनम यादव ४-२२).