जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय महिला संघाने उबेर चषकात थायलंडचा धुव्वा उडवला. कॅनडा, हाँगकाँग पाठोपाठ थायलंडला नमवत भारतीय संघाने गटात अव्वल स्थान पटकावले. सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू आणि ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने आपापल्या लढती जिंकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जेतेपदांचा दुष्काळ संपवण्यासाठी सायनाने दमदार खेळ करत थायलंडच्या रत्नाचोक इन्थॅनॉनचे आव्हान २२-२०, २१-१४ असे सरळ गेम्समध्ये संपुष्टात आणले. सगळ्या फटक्यांचा खुबीने वापर आणि कोर्टवरचा सर्वागीण वावर सायनाच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. पहिल्या गेममध्ये सायनाने ११-८ अशी आघाडी घेतली. मात्र रत्नाचोकने शैलीदार फटक्यांच्या आधारे खेळ करत १२-१२ अशी बरोबरी केली. मात्र यानंतर नेटजवळचे फटके खेळताना रत्नाचोकने भरपूर चुका केल्या. याचा फायदा सायनाने पहिला गेम नावावर केला.
दुसऱ्या गेममध्ये तडाखेबंद स्मॅशेस, अचूक ड्रॉपचे फटके आणि नेटजवळून सुरेख खेळ करत सायनाने प्रभुत्त्व गाजवले. दुखापतीतून पूर्णपणे सावरलेली नसल्याने रत्नाचोकच्या खेळात नेहमीचे कौशल्य जाणवले नाही आणि सायनाने दुसऱ्या गेमसह संस्मरणीय विजय मिळवला. दोन वर्षांनंतर सायनाने रत्नाचोकवर विजय मिळवला.
‘रत्नाचोकला सरळ गेम्समध्ये नमवले आहे यावर विश्वास बसत नाहीये. सिरी फोर्ट कोर्टवर माझी कामगिरी चांगली झालेली नाही. रत्नाचोक जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी आहे. तिच्याविरुद्ध हा विजय म्हणजे मी खरंच कसून सराव केला आहे’, असे सायनाने सांगितले.
दुसऱ्या लढतीत युवा पी.व्ही.सिंधूने पॉर्नटिप बुरानप्रासेर्टुकवर २१-१९, २१-१४ अशी मात केली. यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या सिंधूने जिद्दीने खेळ करत विजय मिळवला.
काही दिवसांपूर्वीच झालेल्या आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीने दुआगॅनॉँग अरुकेसॉर्न-सावित्री अमित्रापै जोडीला २१-१६, २१-१३ असे नमवत भारताला दिमाखदार विजय मिळवून दिला.
बुसानन ओनग्बमुरगपनने पी. सी. तुलसीचा २१-१५, २१-१० असा पराभव केला. बुसाननच्या विजयासह थायलंडने पहिल्या विजयाची नोंद केली. पाचव्या आणि दुहेरीच्या दुसऱ्या लढतीत सायना-सिंधू जोडीला खेळवण्याचा प्रयोग संघव्यवस्थापनाने केला. मात्र हा प्रयोग अपयशी ठरला. सायना-सिंधू जोडीला तीन गेमपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत कुंचला वोराविचिटचायकुल-सापसिरी टेरानाचाय जोडीने १२-२१, २१-१८, १५-२१ असे हरवले.