मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात बाजी मारली आहे. अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने आफ्रिकेवर ६ धावांनी मात करत मालिकेत ३-० असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारताच्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या महिला १४० धावांपर्यंतच मजल मारु शकल्या.

नाणेफेक जिंकत सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार मिताली राजने घेतला. मात्र भारतीय फलंदाजांची सामन्यात पुरती भंबेरी उडाली. जेमायमा रॉड्रीग्ज, पूनम राऊत, मिताली राज, प्रिया पुनिया या महत्वाच्या फलंदाज झटपट माघारी परतल्या. अवघ्या ५५ धावांमध्ये भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता. अखेरीस मधल्या फळीत हरमनप्रीत कौर आणि शिखा पांडे यांनी फटकेबाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. हरमनप्रीतने ३८ तर शिखा पांडेने ३५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मॅरिझन कपने ३, शबनीम इस्माईल-अयबोंगा खाकाने प्रत्येकी २-२ तर तुमी सेखुखूने-नोंदुमिसो शँगेस-सून लुसने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या महिला संघाची सुरुवातही फारशी चांगली झाली नव्हती. ५० धावांत आफ्रिकेच्या पहिल्या फळीतल्या ३ फलंदाज माघारी परतल्या. यानंतर सून लुस आणि मॅरिझन कपने थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र ठराविक अंतराने त्यादेखील माघारी परतल्या. अखेरच्या षटकांमध्ये आफ्रिकेला विजयासाठी अवघ्या १०-१५ धावांची गरज होती. मात्र तळातल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय महिलांनी ६ धावांनी सामन्यात बाजी मारली. भारताकडून एकता बिश्तने ३, दिप्ती शर्मा-राजेश्वरी गायकवेडने प्रत्येकी २-२, तर मानसी जोशी-हरमनप्रीत कौर आणि जेमायमा रॉड्रीग्ज यांनी १-१ बळी घेतला.