भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मिताली महिला क्रिकेटविश्वात सर्वात जास्त धावा करणारी महिला क्रिकेटपटू बनली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना सुरु होण्याआधी मिताली या विक्रमापासून ३३ धावा दूर होती. सलामीवीर स्मृती मंधाना या सामन्यातही अपयशी ठरली. अवघ्या ३ धावा काढत स्मृती मंधाना मागे परतल्यामुळे मिताली राजवर डावाची जबाबदारी आली.

आणि भारतीयांच्या अपेक्षांवर योग्य रितीने उतरत मितालीने अर्धशतकी खेळी करत या विक्रमाला गवसणी घातली आहे. मिताली महिला क्रिकेट विश्वात ६ हजार धावांचा टप्पा गाठणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मिताली राजने ६९ धावांची खेळी केली आहे. या खेळीत ४ चौकार आणि एका षटकाराचाही समावेश होता. याचसोबत मितालीने महिला क्रिकेटमध्ये सर्वाधीक अर्धशतकं करण्याचा विक्रमही केला आहे. आजच्या अर्धशतकानंतर मिताली राजच्या नावावर ४८ अर्धशतकं जमा आहेत.

३४ वर्षीय महिला मिताली राजने १६ व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तिच्या खेळण्याच्या शैलीमुळे बऱ्याच वेळा मिताली राजची तुलना ही सचिन तेंडुलकरसोबत केली जाते. मात्र कोणत्याही पुरुष क्रिकेटपटूसोबत आपली तुलना करणं मिताली राजला अजिबात मान्य नाही. महिला विश्वचषकात आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियासोबत आहे. आफ्रिकेविरुद्धचा सामना गमावल्यानंतर आता भारतासाठी करो या मरोची परिस्थिती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धावसंख्या उभारुन ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय संपादन करण्याचा मिताली राजच्या टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे.