जपानमध्ये महिलांच्या आशिया चषकाच्या अंतिम फेरीत चीनवर मात करुन विजेतेपद पटकावलेल्या भारतीय संघाच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. आधीच्या क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असलेला भारतीय महिलांचा संघ आता १० व्या क्रमांकावर आलेला आहे. भारताच्या पुढे कोरिया आणि स्पेन हे दोन मातब्बर संघ आहेत.

अवश्य वाचा – ‘चक दे’ गर्ल्सवर कौतुकाचा वर्षाव, हॉकी इंडियाकडून एक लाखाचं बक्षीस जाहीर

या यादीत नेदरलँडचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे इंग्लंड आणि अर्जेंटीनाचा संघ आहे. या क्रमवारीत अमेरिकेच्या स्थानात घसरण झाली असून, हा संघ सातव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी या क्रमवारीत चौथं स्थान पटकावलं आहे. न्यूझीलंड आणि जर्मनीचा महिला संघ हा अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर राहिलेला आहे.

अवश्य वाचा – गुणवत्तेवर विश्वचषकासाठी पात्र ठरलो याचा आनंद – राणी रामपाल

चिलीने या क्रमवारीत आपल्या कामगिरीत सुधारणा करत २० व्या स्थानावरुन थेट १५ वं स्थान मिळवलं आहे. पॅन अमेरिकन चषकात रौप्यपदक मिळवल्याचा चिलीच्या संघाला फायदा झाल्याचं दिसून येतंय. चिली व्यतिरीक्त चेक रिपब्लीक (१९ वं स्थान) आणि सिंगापूर (३५ वं स्थान) यांच्या क्रमवारीतही सुधारणा झालेली पहायला मिळते आहे. भारतीय पुरुषांचा हॉकीसंघ क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर कायम आहे.

अवश्य वाचा – Video: हा क्षण तुम्हाला ‘चक दे इंडिया’ची आठवण करुन देईल