भारतीय महिलांनी दिमाखदार खेळाचा प्रत्यय घडवताना शुक्रवारी मलेशियाचा ६-१ असा धुव्वा उडवला आणि आशियाई क्रीडा स्पध्रेच्या उपांत्य फेरीत शानदार प्रवेश केला. ‘अ’ गटातील अखेरच्या साखळी सामन्यात भारताकडून राणी रामपाल (चौथ्या, २०व्या मि.), जसप्रीत कौर (९व्या, ३९व्या मि.), नमिता तोप्पो (१७व्या मि.) आणि वंदना कटारिया (५०व्या मि.) यांनी गोल झळकावले. मलेशियाकडून एकमेव गोल कर्णधार नादिया अब्दुल रेहमानने केला.
रविवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची गाठ कोरियाशी पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी भारताने आत्मविश्वासाने खेळ करीत चौथ्या मिनिटालाच गोल साकारून इरादे स्पष्ट केले. मध्यंतरालाच भारताने ४-० अशी आघाडी घेतली. त्यामुळे मलेशियाला डोके वर काढण्याची संधी मिळाली नाही.
दरम्यान, भारताच्या पुरुष हॉकी संघाचा ‘ब’ गटातील अखेरचा साखळी सामना शनिवारी चीनविरुद्ध होणार आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताला हा सामना किमान बरोबरीत सोडवण्याची नितांत आवश्यकता आहे.
इराणकडून पराभूत
व्हॉलीबॉल
मागील आशियाई क्रीडा स्पध्रेत व्हॉलीबॉलमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या इराणकडून सरळ गेममध्ये हार पत्करण्यापूर्वी भारतीय संघाने शर्थीने लढत दिली. साखळीतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघ ‘प्ले-ऑफ’ फेरीसाठी आधीच पात्र ठरला आहे. ‘क’ गटातील अखेरच्या लढतीत इराणने भारताला २५-२२, २५-२२, २५-१८ असे पराभूत केले. भारताकडून लवमी कटारियाने सुरेख खेळ करत सर्वाधिक ११ गुण कमावले.
कतारचा बास्केटबॉल संघ मायदेशी
हिजाब म्हणजेच डोक्यावर स्कार्फ घालून खेळणाऱ्या कतारच्या महिला बास्केटबॉल संघावर संयोजकांनी बंदीची कारवाई केली आहे. त्यामुळे हा संघ आशियाई क्रीडा स्पर्धेतील साखळी गटाचा कझाकिस्तानब सामना न खेळताच मायदेशी परतला.
कतार संघाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘‘डोक्यावर स्कार्फ घालून खेळल्याबद्दल आमच्या संघावर  आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाने बंदी घातली. त्यामुळे आम्ही  होणारा सामना न खेळण्याचा व मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला.’’
दरम्यान, महासंघाने एका पत्रकाद्वारे म्हटले आहे, ‘‘कोणत्याही धर्माला विरोध म्हणून ही कारवाई करण्यात आलेली नाही. आम्ही महासंघाच्या नियमांनुसारच कारवाई केली आहे. कोणाच्याही धार्मिक भावना भडकाव्यात, असा कोणताही हेतू त्यामध्ये नाही.
स्पर्धेच्या सर्व नियमांचा तपशील प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय संघटनेकडे दिलेला असतो. हे नियम २० वर्षांपूर्वीच तयार करण्यात आलेले आहेत. आजपर्यंत या नियमांबाबत कोणत्याही तक्रारी आलेल्या नाहीत.’’