गुरजित कौर व दीपग्रेस कौर यांनी केलेल्या अप्रतिम गोलामुळेच भारतीय महिला संघास दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा हॉकी सामना २-२ असा बरोबरीत ठेवता आला. चुरशीने झालेल्या या सामन्यात मेरिझन मराईसने तिसऱ्याच मिनिटाला गोल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर बराच वेळ त्यांच्याकडे १-० अशी आघाडी होती. २४ व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नरची संधी लाभली. त्याचा फायदा घेत गुरजितने पहिला गोल केला व १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर पुन्हा दोन मिनिटांनी भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. दीपग्रेसने त्याचा लाभ घेत गोल नोंदविला आणि भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी भारताने राखली होती. आफ्रिकेने उत्तरार्धाच्या प्रारंभापासून वेगवान चाली केल्या. ३४व्या मिनिटाला त्यांच्या दिर्की चेंबर्लीनने सुरेख गोल करीत २-२ अशी बरोबरी साधली.