चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसमुळा आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक नागरिक या व्हायरसच्या विळख्यात सापडले जातायत. भारतामध्येही कोरोनाचे काही संशयास्पद रुग्ण आढळले आहेत. या व्हायरसवर मात करण्यासाठी चीन सरकार सर्वतोपरीने प्रयत्न करत आहे. दरम्यान या परिस्थितीचा फटका भारतीय महिला हॉकी संघाला बसला आहे. चीनमधील परिस्थितीचा अंदाज घेता, महिला हॉकी संघाचा आगामी चीन दौरा रद्द करण्यात आलेला आहे. १४ ते २५ मार्च दरम्यान भारतीय महिला हॉकी संघ चीनचा दौरा करणार होता.

आतापर्यंत किमान ६०० हून अधिक लोकांना या व्हायरसमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर हजारो नागरिकांना या व्हायरसची लागण झालीये. दरम्यान चीन दौरा रद्द झाल्यामुळे याबदल्यात कोणत्या देशाविरुद्ध दौरा आखता येईल यावर हॉकी इंडियाचे पदाधिकारी आणि प्रशिक्षक काम करत आहेत. महिला हॉकी संघातले आघाडीचे संघ सध्या हॉकी प्रो-लिगमध्ये खेळत आहेत. त्यातच टोकियो ऑलिम्पिक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेलं असताना भारतीय संघासाठी चीन दौरा सरावाच्या दृष्टीकोनातून महत्वाचा मानला जात होता. दरम्यान ६ एप्रिलपासून भारतीय महिला खेळाडू ऑलिम्पिकसाठीच्या राष्ट्रीय शिबीरात सहभागी होतील.