जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पध्रेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या कुस्तीपटूंनी निराशाजनक कामगिरीचा पाढा वाचला. ग्रीको रोमन प्रकारात भारताच्या तिन्ही कुस्तीपटूंना उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळाही पार करता आला नाही. गुरप्रीत सिंग (७५ किलो), हरदीप (९८ किलो) आणि दीपक (६६ किलो) यांना पराभव पत्करावा लागला.
गुरप्रीत आणि हरदीप यांनी पहिल्या फेरीचा अडथळा सहज पार केला, परंतु उप-उपांत्यपूर्व फेरीत त्यांना गाशा गुंडाळावा लागला. गुरप्रीतने पहिल्या फेरीत पनामाच्या अ‍ॅल्व्हीस अ‍ॅल्बीनो अ‍ॅलमेंड्राचा १०-२ असा पराभव केला, परंतु उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या अ‍ॅण्ड्रय़ू थॉमस बिसेकने ६-४ अशा फरकाने तला पराभूत केले. हरदीपनेही उजबेकिस्तानच्या जाहोंगीर तुर्डीएव्हवर १०-१ असा दणदणीत विजय साजरा करीत आगेकूच केली. मात्र, त्याची ही घोडदौड रोमानियाच्या अ‍ॅलीन अ‍ॅलेक्सक सिउरारीयूने रोखली. अ‍ॅलीनने ९-० अशा फरकाने विजय साजरा केला. ६६ किलो वजनी गटात दीपकला पहिल्याच फेरीत ग्रीसच्या व्लॅडीमिरोस मॅथिआसकडून ०-१६ असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला.