करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. करोनाचा फटका ऑलिम्पिक स्पर्धेला बसला असून टोक्यो ऑलिम्पिक २०२० आता २०२१मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पण क्रीडापटू त्यासाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत.

भारताचा प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनिया याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. त्यात त्याने आपल्या तगड्या वर्कआऊचटची झलक दाखवून दिली. त्यात तो एका भिंतीला टेकवलेल्या उंच मॅटवर उड्या मारून सराव करतो आहे. बजरंगने त्या व्हिडीओखाली एक दमदार कॅप्शन लिहिले. “ख्वाब टूटे हैं मगर हाँसले जिन्दा हैं, हम वो हैं जहाँ मुश्किलें शर्मिदा हैं .. !!”, असे लिहित, कितीही कठीण परिस्थिती असेल तरी हार मानायची नाही असा संदेश त्याने दिला.

मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर बजरंग पुनियाचे प्रशिक्षक आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी जॉर्जियाला गेले होते. करोनाच्या कठीण काळात त्यांनी आपल्या कुटुंबासोबत असावे असे बजरंगचे मत होते, त्यामुळे त्यांना त्याने पाठवले होते. पण आता ३० जुलैला ते भारतात परतत आहेत. भारतात येण्याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे. तिथे आल्यानंतर काही काळ मला क्वारंटाइन राहावे लागेल हे मला माहिती आहे, पण सध्या बजरंगला सरावात माझी मदत होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.