धनंजय रिसोडकर – response.lokprabha@expressindia.com

क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, बॅडमिंटन हे खेळ अधिक लोकप्रिय करण्यात त्या खेळांसाठीच्या लीगचा मोठा वाटा आहे. आता त्याच यादीत कुस्तीसाठीच्या लीगची भर पडते आहे.

महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा खेळ म्हणजे कुस्ती. एकेकाळी कुस्तीवर केवळ महाराष्ट्राचीच मक्तेदारी होती. गेल्या तीन दशकांमध्ये तिला लागलेली घरघर आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याची चिन्हे आहेत. या खेळाच्या लीगसाठी दोन वाहिन्यांमध्ये रंगलेली चढाओढ, मोठे खेळाडू आपल्याकडे ओढण्यासाठी लागलेली चुरस आणि त्यांच्यातील डाव- प्रतिडाव पाहिल्यानंतर या लीगमुळे कुस्तीचे धुमशान चांगलेच रंगणार असे दिसू लागले आहे.

सुशीलकुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिकने ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवल्यापासूनच भारतात खऱ्या अर्थाने कुस्तीला गतवैभवाचे दिवस येण्याचे संकेत मिळू लागले. खरं तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ साली हेलसिंकी ऑलिम्पिकमधील पहिले पदक भारताला कुस्तीतच मिळाले होते. तेदेखील महाराष्ट्राच्या लाल मातीतील मल्ल खाशाबा जाधव यांना. मात्र, त्या पदकाची म्हणावी तशी कदर झाली नाही. त्या पदकविजेत्या खाशाबांना दुर्लक्षित ठेवले गेल्यामुळेच कुस्तीचे दुसरे ऑलिम्पिक पदक मिळवायला आपल्या देशाला पाच दशकांहून अधिक काळ वाट पहावी लागली. मात्र, उशिराने का असेना सुशीलकुमारपासून पुन्हा कुस्तीतील सर्वोच्च स्पर्धेत देशाला पदके मिळण्यास प्रारंभ झाला. त्यातच या दशकामध्ये हिंदीत आलेल्या ‘सुलतान’ आणि ‘दंगल’ या दोन चित्रपटांनी कुस्तीला पुन्हा वलय निर्माण करून दिले. ‘दंगल’ने तर मुलींच्या कुस्तीलादेखील लोकप्रिय केले आहे. सामान्य लोकांना एकदा का खेळ कळला की मग त्या खेळाच्या चाहत्यांमध्ये आपोआपच कुतूहल, चुरस आणि रस निर्माण होतो. आयपीएलपासून खेळप्रकारांमधील हे टीआरपीचे गणित वाहिन्यांना चांगलेच कळून चुकले आहे. त्यामुळेच क्रिकेट लीग यशस्वी होत असल्याचे प्रारंभीच्या तीन वर्षांनंतरच दिसू लागल्यानंतर फुटबॉल लीग, हॉकी लीग, कबड्डी लीग, बॅडमिंटन लीग, बॉक्सिंग लीग अगदी टेनिस लीगचेही प्रयोग झाले. त्यातील काही अपवाद वगळता बहुतांश लीग आपापला प्रेक्षकवर्ग टिकवून आहे. क्रिकेट आणि कबड्डी या खेळांचे लीग सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी ठरले आहेत. फुटबाल लीग देशाच्या पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये प्रचंड लोकप्रिय असले तरी सर्वत्र तशी परिस्थिती नाही. हॉकी लीग उत्तर आणि पूर्वेकडे अधिक लोकप्रिय असली तरी अन्य दोन दिशांना तेवढी क्रेझ नाही. असे प्रत्येक लीगचे कमी-अधिक प्रमाणात वेगळेपण असले तरी या सगळ्या लीग त्यांचे प्रभावक्षेत्र कायम राखून आगेकूच करताना दिसत आहे.

मुलींची कुस्ती या विषयाच्या कथाबीजातून निर्माण झालेला ‘दंगल’सारखा चित्रपट प्रचंड चालल्यानंतर या खेळाच्या बाजारमूल्यात अचानकपणे भरघोस वाढ झाली. तसेच त्यातील संभाव्य यशाची खात्री लक्षात घेऊन या खेळाची लीग भरवण्याचे विचार संघटन स्तरापासून सर्वच स्तरांवर होऊ लागला. सर्वप्रथम नगर जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांकडून या दृष्टीने कुस्तीगीर परिषदेकडे विचारणा करण्यात आली. मात्र, त्यात अनेक तांत्रिक बाबी आणि कायदेशीर बाबींचा अंतर्भाव असल्याने त्या सर्व बाबींची सांगड घालणे कर्मकठीण ठरत होते. तसेच त्यात पैसा दिसू लागल्याने मग भविष्यात सर्वच सूत्रे एकाच जिल्ह्य़ाच्या हाती जाऊ नयेत, यासाठी त्यांचे ‘हितचिंतक’ कामाला लागले. दरम्यान काही झटपट आयोजकांनी मिळून गामा लीग नावाच्या कुस्ती लीगची घोषणादेखील करून टाकली. पण पुढे सगळेच थंड पडले. सगळ्या बाबींचा एकत्रित परिणाम म्हणूनच की काय वाहिन्यांनादेखील अचानकपणे या खेळामध्ये खूप मोठा टीआरपी दिसू लागला. चित्रपटांना मिळालेली लोकप्रियता पाहता मोठय़ा प्रमाणात प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचता येऊ शकतो, हे समीकरण या वाहिन्यांच्या संचालकांना लक्षात आले. त्यानुसार मग मराठीतील दोन वाहिन्यांनी गत सहा महिन्यांपासून आपल्या वाहिनीवर या कुस्तीची लीग भरवण्याच्या दृष्टीने नियोजनाला प्रारंभ केला.

प्रदीर्घ काळापासून कुस्तीगीर परिषदेचा कारभार एकहाती हाकलला जात होता. मात्र, केंद्रात आणि राज्यातदेखील सत्तेपासून दूर गेलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीदेखील गत दोन वर्षांपासून पुन्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपद हातात घेऊन विशेष लक्ष घालण्यास प्रारंभ केला. संघटनेच्या बैठकांना स्वत: उपस्थित राहून त्यांनी परिषदेच्या कामकाजावर पुन्हा आपली मांड बसवली. त्यामुळे प्रत्येक बैठक आणि त्यापुढे येत गेलेले प्रस्ताव यांच्याबाबत गांभीर्याने चर्चा होऊ लागली. तसेच त्यांना क्रिकेट लीगच्या आयोजनाचादेखील दांडगा अनुभव असल्याचा लाभ कुस्ती लीगच्या आयोजनातील घोळ मिटवण्यास लाभदायक ठरला. त्यामुळे कुस्ती लीगमध्ये कुस्तीपटू, पंच, तांत्रिक साहाय्यक ते अगदी कुस्तीगीर परिषद यांना कशाप्रकारे मानधन मिळणार इथपासून सर्व कायदेशीर अडचणींवर तोडगा काढण्यापर्यंतचे सर्व पर्याय तपासून पुढे मार्गक्रमण झाले. तसेच ही लीग सुरू करताना केवळ एकाच वर्षांपुरता विचार न करता पुढील पाच वर्षांचे नियोजन आणि आराखडय़ाचा मसुदा लिखित स्वरूपात संबंधित वाहिन्यांकडे मागण्यात आला. कलर्स आणि झी वाहिन्यांमध्ये ही लीग आपल्याच वाहिनीवर व्हावी, अशी चढाओढ होती. त्याचा अचूक लाभ उठवत परिषदेकडून त्यांना सर्वाधिक चांगल्या प्रस्तावांना प्रथम संधी देण्याचे निश्चित केले. त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण होऊन त्या संपूर्ण प्रक्रियेत झी वाहिनीने आघाडी मारली. झी वाहिनीची काम करण्याची पद्धत आणि तडीस नेण्याची धडाडी याचा पूर्वानुभव असल्याने पवार यांच्या अध्यक्षतेखालील कुस्तीगीर परिषदेने या वाहिनीला नोव्हेंबरमध्ये लीग भरवण्यास परवानगी देण्याचे करार करून त्यांना प्रथम संधी देण्याबाबत अधिकृततेची मोहोर उमटवली. त्यामुळेच येत्या २ नोव्हेंबरपासून झी वाहिनीवर कुस्तीचा फड रंगणार असून त्यातील रोचकतेमुळे सर्व वयोगटातील पुरुष, महिला आणि बाल प्रेक्षकांनादेखील आकर्षित करण्यात तो यशस्वी ठरू शकणार आहे. त्यानंतर कलर्स वाहिनीच्या कुस्ती लीगचादेखील पहिला सीझन नवीन नावासह जानेवारी किंवा फेब्रुवारी २०१९ मध्ये भरणार आहे. त्यामुळे या दोन उरुसांपैकी कोणता फड अधिक रंगतो, ते येत्या काळात दिसणारच आहे. परंतु, या दोन्ही वाहिन्यांच्या झुंजीत प्रेक्षकांना मात्र अव्वल दर्जाची कुस्ती घरबसल्या बघण्याचा आनंद लुटता येणार आहे.

डावपेच

‘कुस्ती लीग’ च्या जंगी फडाच्या आयोजनात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी लक्ष घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यात ते कोणत्याही मैदानात असले तरी एकदा का त्यांनी ठरवले की समोरच्याला ‘धोबीपछाड’ द्यायचा तर तो ते देणार म्हणजे देणारच, ही त्यांची खासियत सर्वज्ञात आहे. त्यामुळे या आयोजनात ते कुणाला अस्मान दाखवतात, त्याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेले होते. त्यानिमित्ताने झालेल्या बैठकीत त्यांनी कुस्तीगीर परिषदेचा गत २० वर्षांचा लेखाजोखा मागवत आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली. एका लाडक्याच्या ‘लालित्य’पूर्ण कलांना रोखण्याचे ठरवूनच त्यांनी हा ‘इराणी डाव’ टाकल्याच्या चर्चेला त्यामुळे बहर आला. तसेच सर्वाधिकारांचे वितरण एका समितीकडे देतानाच आर्थिक व्यवहारांसाठी विश्वासातील स्वतंत्र ऑडिटरची नियुक्ती केली. पवारांनी भर बैठकीत त्या पदाधिकाऱ्याची कानउघाडणी केल्याने योग्य तो संदेश सर्वांपर्यंत पोहोचला.  एकेकाळच्या निकटच्या सहकाऱ्याला पवारांनी अशी ‘बगलडूब’ मारत त्याची ‘मोळी’ बांधली की आपण चितपट होतोय, हे कळूनसुद्धा त्यांना काहीच करता येईना झाले आहे.
सौजन्य – लोकप्रभा