भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने (८९ चेंडूंत नाबाद १०५ धावा) झळकावलेल्या शतकाला सूर्यकुमार यादव (५०) आणि धवल कुलकर्णी (३/३५) यांच्या कामगिरीची अप्रतिम साथ लाभल्याने मुंबईने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. मुंबईने दिल्लीचा सात गडी आणि १०९ चेंडू राखून धुव्वा उडवला.
प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. अनुभवी सलामीवीर शिखर धवन (०), अनुज रावत (०), नितीश राणा (२) स्वस्तात माघारी परतले. कुलकर्णीच्या भेदक गोलंदाजीपुढे त्यांची एकवेळ ६ बाद ३२ धावा अशी अवस्था झाली. परंतु हिम्मत सिंग (नाबाद १०६) आणि शिवांक वशिष्ठ (५५) यांनी सातव्या गड्यासाठी रचलेल्या १२२ धावांच्या भागीदारीमुळे दिल्लीने ५० षटकांत किमान ७ बाद २११ धावांपर्यंत मजल मारली.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने यशस्वी जैस्वालला (८) लवकर गमावले. परंतु त्यानंतर पृथ्वीने सामन्याची सूत्रे हाती घेतली. पृथ्वीने १५ चौकार आणि दोन षटकारांसह धडाकेबाज शतकी खेळी साकारून सूर गवसल्याचे संकेत दिले. त्याने सर्वप्रथम कर्णधार श्रेयस अय्यरसह (३९) दुसऱ्या गड्यासाठी ८२ धावांची भर घातली. तर इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या सूर्यकुमारच्या साथीने त्याने तिसऱ्या गड्यासाठी ९३ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमारनेदेखील नेहमीच्या आक्रमक शैलीत फटकेबाजी करताना सहा चौकार आणि दोन षटकारांसह ३३ चेंडूंत ५० धावा काढल्या. पृथ्वीनेच चौकार लगावून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आता मंगळवारी मुंबईची महाराष्ट्राशी गाठ पडणार आहे.
महाराष्ट्राच्या विजयात ऋतुराज चमकला
ऋतुराज गायकवाडने (१०२ धावा) साकारलेल्या शतकाच्या बळावर महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत हिमाचल प्रदेशचा ५९ धावांनी पराभव केला. ‘ड’ गटातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ५० षटकांत ८ बाद २९५ धावांपर्यंत मजल मारली. ऋतुराज आणि यश नाहर (५२) यांनी शतकी सलामी नोंदवली. ऋतुराजने नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने १०९ चेंडूंत १०२ धावा फटकावल्याने महाराष्ट्राने पावणे दोनशे धावांचा पल्ला गाठला. प्रत्युत्तरात वेगवान गोलंदाज राजवर्धन हणगार्गेकरच्या (४/४२) भेदक गोलंदाजीपुढे हिमाचल प्रदेशच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. अभिमन्यू राणा (४६) आणि अमित कुमार (३४) यांनी त्यांच्यातर्फे थोडाफार प्रतिकार केला, परंतु तरीही हिमाचलचा डाव ४८.३ षटकांत २३६ धावांत संपुष्टात आला.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली : ५० षटकांत ७ बाद २११ (हिम्मत सिंग नाबाद १०६, शिवांक वशिष्ठ ५५; धवल कुलकर्णी ३/३५) पराभूत वि. मुंबई : ३१.५ षटकांत ३ बाद २१६ (पृथ्वी शॉ नाबाद १०५, सूर्यकुमार यादव ५०; ललित यादव २/३२)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 1:18 am