नाशिकच्या अंजना ढवळू ठमकेने महिलांची ८०० मीटर शर्यत जिंकून भारताच्या खात्यावर तिसऱ्या सुवर्णपदकाची नोंद केली. नानजिंग येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पध्रेतील मैदानी क्रीडा प्रकारात भारताने गुरुवारी सुवर्णपदकासहित चार पदकांची कमाई केली.
ठमकेने आपली वैयक्तिक सर्वोत्तम अशी २ मिनिटे ११.४७ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. मलेशियाच्या सविंदर कौरला (२:१४.१४ मिनिटे) रौप्य आणि श्रीलंकेच्या के. दिलहानी फर्नाडोला (२:१५.७२ मिनिटे) कांस्यपदक मिळाले. आठ जणांचा समावेश असलेल्या अंतिम शर्यतीत ठमकेने प्रारंभीपासून आघाडी घेत स्पर्धा जिंकली
याशिवाय रॉचेले मॅकफरलेन मारियाने महिलांच्या तिहेरी उडी प्रकारात रौप्यपदक जिंकले. याचप्रमाणे रॉचेलेने १२.३८ मीटर अशी कामगिरी आपल्या पाचव्या संधीमध्ये साकारून रौप्यपदक काबीज केले. भारतासाठी वादग्रस्त ठरलेल्या या स्पध्रेत मैदानी क्रीडा स्पध्रेतील १८ खेळाडूंना वयाच्या मुद्यावरून प्रवेश नाकारण्यात आला.
याचप्रमाणे गार्वित बात्राने पुरुष एकेरी टेनिसमध्ये आणि महिला संघाने स्क्वॉशमध्ये कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या स्क्वॉश संघाने चीनचा २-१ असा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवत आणखी एक पदक निश्चित केले आहे. फिलिपाइन्सच्या द्वितीय मानांकित ज्युरेन्स झोसिमो मेन्डोझाने गार्विटचा ६-४, ६-७, ६-० असा पराभव केला. तथापि, स्क्वॉशमध्ये मलेशियाच्या संघाने भारताच्या हर्शित कौर आणि आद्य अडवईचा २-० असा पराभव केला
स्पध्रेचा एक दिवस शिल्लक असताना भारताच्या खात्यावर ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ५ कांस्य अशी ११ पदके जमा आहेत.