जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं. उपांत्य फेरीत टर्कीच्या बुसेन्झ कैरोग्लुने मेरी कोमला पराभूत केलं. या पराभवामुळे मेरी कोमला कांस्यपदकावर समाधान मानावं लागणार आहे. मात्र सामना संपल्यानंतर काही मिनीटांमध्येच मेरी कोमने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पंचांच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी बोलून दाखवली. १ विरुद्ध ४ च्या फरकाने पंचांनी टर्कीच्या बुसेन्झच्या खात्यात आपली मतं टाकली.

सामना संपल्यानंतर निर्णयावर नाराज झालेल्या मेरी कोमच्या प्रशिक्षक वर्गाने सामन्याच्या तांत्रिक समितीकडे दाद मागितली. मात्र पंचांची मत २ विरुद्ध ३ किंवा १ विरुद्ध ३ अशा स्वरुपात असली तरच, पराभूत उमेदवाराचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. उपांत्य सामन्यात टर्कीच्या खेळाडूच्या खात्यात ४ पंचांनी आपली मत टाकल्यामुळे भारताचं हे अपिल फेटाळण्यात आलं. ज्यामुळे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमचा प्रवास अखेरीस संपुष्टात आला आहे.