२०२८मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील अव्वल पदक विजेत्यांमध्ये भारताचे स्थान असेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी व्यक्त केला.

२०१८ हे वर्ष भारताच्या क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत यशदायी ठरले असल्याचा दावा करताना राठोड म्हणाले, ‘‘मला भारतीय युवकांच्या क्षमतांबाबत खूप आशा आणि विश्वास आहे. खेळांमधील प्रगतीच्या दृष्टीने प्रारंभ झाला असून त्या चाकाला गती देण्याचे काम सर्वतोपरीने केले जात आहे. २०२०चे ऑलिम्पिक अत्यंत जवळ आले असून तिथे भारतीय संघ सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. त्या स्पर्धेत किती पदके मिळू शकतील, त्याचा अंदाजदेखील प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी बांधता येणे शक्य होईल, असे आमचे नियोजन आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘२०२४ व २०२८च्या ऑलिम्पिकच्या दृष्टीने आपण योजना आखली आहे. भारताची प्रगती पाहता २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यावर बरीच पदके असतील.’’