जागतिक मल्लखांब स्पर्धा

जागतिक मल्लखांब स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय पुरुष मल्लखांबपटूंनी अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजवले. मात्र मुलींच्या गटातील पोल मल्लखांब प्रकारात भारतीय मुलींना कोरिया आणि इटलीच्या मुलींनी आव्हान दिले. रविवारी स्पर्धेची सांगता होणार असून वैयक्तिक विजेतेपदासह सर्व विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे.

शनिवारी शिवाजी पार्कवर राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे, अभिनेते नसीरुद्दीन शहा, राष्ट्रीय मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष रमेश इंदोलिया आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेचा प्रारंभ झाला. उद्घाटन सोहळ्यानंतर कमला मेहता शाळेच्या अंध विद्यार्थिनींची प्रात्यक्षिके, समर्थ व्यायामशाळेच्या मल्लखांबपटूंच्या कसरती आणि मानवी मनोरे यांचे सादरीकरण करण्यात आले. विदेशी खेळाडूंनी मल्लखांब आणि दोरीवर केलेल्या मल्लखांब प्रदर्शनानंतर भारतीय खेळाडूंनी त्यांच्या सर्वागसुंदर खेळाचे कौशल्य दाखवत उपस्थित क्रीडाप्रेमींची दाद मिळवली. पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेमध्ये इराण, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, जपान, इंग्लंड, भारत, नॉर्वे, बहारीन, फ्रान्स, इटली, स्पेन, झेक रिपब्लिक, अमेरिका, जर्मनी अशा देशांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे औचित्य साधून मल्लखांब या खेळासाठी झटलेल्या सुरेश देशपांडे , रिचर्ड पेअर्सन , अच्युत साठय़े व उलगा दुराई  यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मल्लखांबसाठी महाराष्ट्रात दोन अकादमींची निर्मिती

मल्लखांब या खेळाचा राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून क्रीडा प्रकाराच्या यादीत समावेश केला आहे. तसेच केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी मल्लखांबसाठी विशेष निधी देऊन देशभरात अकादमी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महाराष्ट्रात मुंबईला आणि अमरावतीला अकादम्या निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिली. ‘‘मल्लखांबला क्रीडा प्रकारांच्या यादीत स्थान दिल्याने खेळाडूंना ५ टक्के नोकरी आरक्षण, गुणांचे लाभ हे सर्व मिळू शकणार आहेत. मल्लखांबची पहिली जागतिक स्पर्धा महाराष्ट्रात झाल्याचा मला विशेष अभिमान आहे, असे तावडे यांनी सांगितले.  ‘‘मल्लखांब हा खेळ शरीराबरोबरच बुद्धीच्या विकासासाठी, दोन्हींच्या संतुलनासाठी तसेच एकाग्रता वाढीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे मुलांसाठी आणि समाजमाध्यमांच्या आहारी गेलेल्यांसाठी दोन्ही अर्थाने उपयुक्त आहे,’’ असे तावडे म्हणाले.