तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धा

तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रविवारी ऑस्ट्रेलियाशी सामना करताना भारतीय महिला संघाला क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याची नितांत आवश्यकता आहे.

सलामीच्या लढतीत शुक्रवारी इंग्लंडला पाच गडी राखून नमवल्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुणतालिकेत अग्रस्थानावर आहे. भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडला १४७ धावसंख्येवर रोखले. मग हे आव्हान पार करताना हरमनप्रीतने नाबाद ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

भारताच्या फलंदाजीची मदार शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत या आघाडीच्या चौघांवर असेल. कारण मधल्या फळीतील वेदा कृष्णमूर्ती आणि तानिया भाटिया धावांसाठी झगडत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत, जेमिमा आणि वेदा यांनी झेल सोडून क्षेत्ररक्षणात निराशा केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत त्यांना कामगिरी सुधारावी लागणार आहे.

शनिवारी ‘सुपर ओव्हर’पर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडकडून हार पत्करली होती. या पराभवातून सावरत भारताचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलावे लागणार आहे. २०१८च्या तिरंगी ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन्ही लढती गमावल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे पारडे जड मानले जात आहे.

* वेळ : सकाळी ८.४० वा.

* थेट प्रक्षेपण : सोनी टेन ३