दोहा : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने ७४ गोल करत अर्जेटिनाचा लिओनेल मेसी याच्यावर सरशी साधली आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा छेत्री हा सध्या खेळत असलेला दुसरा खेळाडू ठरला आहे. या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो (१०३ गोल) अग्रस्थानी आहे.

३६ वर्षीय छेत्रीने २०२२च्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत बांगलादेशविरुद्ध दोन गोल झळकावत हे यश संपादन केले. संयुक्त अरब अमिरातीच्या अली मबखौत याने ७३ गोल करत तिसरे स्थान प्राप्त केले असून मेसी ७२ गोलसह चौथ्या स्थानी आहे. आता सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या जगातील अव्वल १० फुटबॉलपटूंमध्ये स्थान मिळवण्याकरिता छेत्रीला फक्त एका गोलची आवश्यकता आहे. भारताचा पुढील सामना १५ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.