२०२७ साली एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क मिळवण्यासाठी भारताने आपली निविदा सादर केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) अधिकृतपणे याबाबतची घोषणा केली आहे.

भारताने ही बोली जिंकल्यास, आशिया खंडातील प्रतिष्ठेची समजली जाणारी ही स्पर्धा भारतात पहिल्यांदाच आयोजित केली जाईल. ‘‘ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे आम्ही आशियाई फुटबॉल महासंघाला (एएफसी) आम्ही कळवले आहे. पुढील वर्षी यजमान देशाची घोषणा केली जाणार आहे,’’ असे ‘एआयएफएफ’चे सरचिटणीस कु शल दास यांनी सांगितले.

‘एएफसी’ने या स्पर्धेसाठी उत्सुक असलेल्यांनी अधिकृतपणे निविदा करण्याची मुदत तीन महिन्यांसाठी वाढवली आहे. भारताने तीन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे, पण एकदाही या स्पर्धेचे आयोजन के ले नाही. २०२७च्या आशियाई चषकासाठी उत्सुक असलेला भारत हा पहिला देश ठरला आहे.

भारताने २०२३च्या ‘एएफसी’ आशियाई स्पर्धेच्या यजमानपदासाठी थायलंड, इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियासह बोली लावली होती, पण ऑक्टोबर २०१८ मध्ये भारताने माघार घेतली. त्यानंतर थायलंड आणि दक्षिण कोरियानेही माघार घेतल्यामुळे या शर्यतीत चीन हा एकमेव देश राहिला होता. आता २०२७च्या ‘एएफसी’ आशियाई चषकाच्या आयोजनासाठी भारतासह दक्षिण कोरियाही शर्यतीत असण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत २०१७च्या कुमार विश्वचषक तसेच २०२०च्या कुमारी विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क मिळवले आहेत. तसेच २०२२ मध्ये महिलांच्या ‘एएफसी’ आशियाई चषकाचे यजमानपदही भारताने मिळवले आहेत.