पूर्वीच्या भारतीय गोलंदाजी आक्रमणाची तुलना करता, सध्याचे आक्रमण सर्वोत्तम आहे. या दमदार गोलंदाजीचा सामना करण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी जलदगती गोलंदाज जेफ लॉसन यांनी व्यक्त केले.

भारतीय गोलंदाजीची लॉसन यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘‘भारताकडे सध्या अत्यंत दर्जेदार वेगवान गोलंदाज असून त्यांच्या गोलंदाजीत विविधता आहे. इशांत शर्माने गेल्या वेळी येथील खेळपट्टय़ांवर मिळालेल्या अतिरिक्त उसळीचा फायदा उठवला होता. उमेश यादव खूप वेगवान गोलंदाजी करतो, तर मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे चेंडू चांगला स्विंग करू शकतात. अर्थात, हे चौघेही एकाच वेळी खेळणार नसले तरी त्यापैकी काही जण आणि फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात. भारताची फिरकी गोलंदाजीही चांगली असून ते नेहमीच आपली जबाबदारी चोख पार पाडतात,’’ असे लॉसन यांनी सांगितले.

१९८० च्या दशकात कसोटी क्रिकेट खेळलेल्या लॉसन यांच्या नावावर १८० कसोटी बळींची नोंद आहे. अ‍ॅडलेड येथे पहिला सामना खेळवला जाणार असल्याचा लाभ भारताला नक्कीच मिळणार आहे. ब्रिस्बेन किंवा पर्थमध्ये पहिला सामना खेळवला गेला असता तर ते भारतासाठी तितकेसे योग्य ठरले नसते. भारताची गोलंदाजी खरोखरच चांगली असल्याने ही मालिका अटीतटीची होईल, असेही लॉसन यांनी नमूद केले.