भारतीय पुरुष हॉकी संघात जागतिक दर्जाच्या बचावपटूंचा समावेश आहे. तसेच दर्जेदार ड्रॅग-फ्लिकर्सच्या समावेशामुळे भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जगातील कोणत्याही संघाला आव्हान देऊ शकतो, असा विश्वास भारताचा माजी हॉकीपटू व्ही. आर. रघुनाथ याने व्यक्त केला.

‘‘सध्याच्या संघात चार पेनल्टी कॉर्नर विशेषज्ञ असल्यामुळे भारतीय संघ टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मोठी मजल मारू शकतो. भारतीय संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा असून प्रत्येक बचावपटूकडे किमान ५० ते ८० सामन्यांचा अनुभव आहे. प्रत्येकाला एकमेकांच्या खेळाची पूर्ण जाण असून ते कोणत्याही संकटावर मात करतील,’’ असे रघुनाथने सांगितले.