भारतीय क्रिकेट संघासाठी हा हंगाम इतिहास घडवणाराच ठरला आहे. न्यूझीलंडच्या भूमीवर प्रथमच ट्वेन्टी-२० सामना जिंकण्याची किमया साधून भारताने मालिकेत बरोबरी साधली. आता रविवारी होणाऱ्या अखेरच्या सामन्यातील विजयासह न्यूझीलंडमध्ये ट्वेन्टी-२० मालिका पहिल्यांदा जिंकण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे.

भारतीय क्रिकेट संघासाठी मागील तीन वष्रे ही संस्मरणीय ठरली आहेत. ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी आणि एकदिवसीय मालिकाजिंकण्याचा पराक्रम भारतीय संघाने दाखवला. मग न्यूझीलंडमधील एकदिवसीय मालिकेत ४-१ असा शानदार विजय मिळवल्यानंतर आणखी एक इतिहास भारताला साद घालत आहे. त्यामुळे आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने हे यश भारताचा आत्मविश्वास उंचावणारे ठरेल.

तिसऱ्या सामन्यासाठीही संघ कायम?

पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तिसऱ्या सामन्यासाठी ११ जणांच्या संघात कोणताही बदल होण्याची संभावना नाही. कुलदीप यादवला संघात स्थान देता येऊ शकते. मात्र यजुर्वेद चहलची उपयुक्तता पाहता त्याच्या जागी कुलदीपला स्थान देणे कठीण आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात सलामीवीर टिम सेफर्टने हल्लाबोल केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांना लय सापडली आहे. कृणाल पंडय़ाने दोन्ही सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारवर भारताच्या गोलंदाजीची प्रमुख मदार असेल. खलील अहमदनेही टिच्चून गोलंदाजी केली होती.

हॅमिल्टनलाच हाराकिरी..

सेडॉन पार्कच्या याच खेळपट्टीवर झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ट्रेंट बोल्सह न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली होती. भारताचा डाव फक्त ९२ धावांत गडगडला होता. त्यामुळे भारतीय संघाला खेळपट्टीची चिंता असेल. मात्र याबाबत भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद म्हणाला, ‘‘हॅमिल्टनला आम्ही खेळलो आहोत. खेळपट्टीबाबत तसे आश्चर्यचकित होण्यासारखे काहीच नाही. पहिल्या सामन्याच्या पराभवातून आम्ही धडा घेतला आहे. आता दुसरा ट्वेन्टी-२० सामना जिंकल्यामुळे अंतिम सामन्यासाठी आत्मविश्वास उंचावला आहे.’’

रोहितच्या आक्रमकतेचा धसका

प्रभारी कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला. या सामन्यात त्याने २९ चेंडूंत घणाघाती ५० धावा काढल्या. त्याच्या आक्रमक फटकेबाजीमुळे किवी गोलंदाजांची लय बिघडली. शिखर धवनने त्याला छान साथ दिली. महेंद्रसिंह धोनीचा अनुभव आणि ऋषभ पंतची निडर वृत्ती अशा मधल्या फळीच्या समन्वयामुळे ऑकलंडच्या विजयाचा अध्याय लिहिला गेला.

न्यूझीलंडची मदार टेलरवर

न्यूझीलंडच्या फलंदाजीचा रॉस टेलर हा प्रमुख आधारस्तंभ आहे. त्याला कर्णधार केन विल्यम्सनची अप्रतिम साथ मिळते. गोलंदाजांमध्ये टिम साऊदीने पहिल्या सामन्यात आपली छाप पाडली होती. दुसऱ्या सामन्यात मात्र साऊदी आणि स्कॉट कुगेलिन यांची गोलंदाजी महागडी ठरली होती.

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, कृणाल पंडय़ा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पंडय़ा, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), डग ब्रेसवेल, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फग्र्युसन, स्कॉट कुगेलिन, कॉलिन मुन्रो, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर, टिम सेफर्ट, ईश सोधी, टिम साऊदी, रॉस टेलर, ब्लेअर टिकनर, जेम्स नीशाम.

सामन्याची वेळ : सकाळी १२.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १