भारत-वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहली या त्रिकुटाच्या वादळी फलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला ट्वेन्टी-२० मालिकेत २-१ असे नामोहरम केले. आता कॅरेबियन संघावर सलग १०व्या एकदिवसीय मालिकेत विजय मिळवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. विंडीजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील रविवारी चेन्नईत होणाऱ्या पहिल्या लढतीत भारताचे पारडे जड मानले जात आहे. परंतु गेले २४ तास पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सामन्यावर अनिश्चिततेचे सावट आहे.

मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे माघार घेणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची उणीव भारतीय संघाला तीव्रतेने भासणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणारा मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला भुवनेश्वरच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे.

ट्वेन्टी-२० प्रमाणेच एकदिवसीय क्रिकेट प्रकारातही यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीकडे बारकाईने लक्ष असेल. फलंदाजी आणि यष्टीरक्षण या दोन्ही बाबतीत त्याच्याकडून निराशा होत आहे. त्यामुळे कोहली आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवण्याची संधी त्याला या मालिकेत मिळणार आहे.

मयंकला सलामीची संधी

सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत झालेल्या दुखापतीतून सलामीवीर शिखर धवन अद्याप सावरलेला नाही. त्याच्या जागी संघात स्थान मिळालेला मयंक अगरवाल संधीचे कसे सोने करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक सलामीवीर म्हणून छाप पाडणाऱ्या मयंकने रणजी करंडक स्पर्धेत तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात कर्नाटकचे प्रतिनिधित्व करून तो भारतीय संघात सामील झाला आहे.

श्रेयस चौथ्या स्थानाचा पर्याय

श्रेयस अय्यरनेही मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयसला चौथ्या स्थानावर फलंदाजीला उतरवावे, अशी सूचना भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी केली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतही भारताला चौथ्या स्थानाची उणीव तीव्रतेने भासली होती. अंबाती रायुडू, विजय शंकर यांच्यानंतर आता श्रेयसला या स्थानासाठी अजमावणे योग्य ठरेल. ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ७१ आणि ६५ धावा अशा दोन धडाकेबाज खेळी साकारल्या होत्या.

‘कुलचा’ युतीवर फिरकीची भिस्त?

विश्वचषक स्पर्धेत ‘कुलचा’ म्हणून ओळखली जाणारी यजुर्वेद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांवर भारताची मदार होती. परंतु त्यानंतर ते एकत्रितपणे कधीच खेळले नाहीत. परंतु चेपॉकच्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ही युती पुन्हा अवतरण्याची चिन्हे आहेत. अनुभवी मोहम्मद शमी आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दीपक चहरवर भारताच्या वेगवान माऱ्याची भिस्त असेल.

विंडीजला लेविसची चिंता

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर एव्हिन लेविसला मुंबईतील ट्वेन्टी-२० सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. तो खेळू शकला नाही, तर विंडीजच्या चिंतेत भर पडू शकेल. ट्वेन्टी-२० प्रकारात अतिआक्रमक पद्धतीने मिळवलेले यश विंडीजला एकदिवसीय प्रकारात दाखवता आलेले नाही. यासंदर्भात साहाय्यक प्रशिक्षक रॉडए ईस्टविक यांनीही खेळाडूंची कानउघाडणी केली आहे. शिम्रॉन हेटमायर आणि निकोलस पूरन यांच्याकडून विंडीजला मोठय़ा अपेक्षा आहेत. अष्टपैलू रोस्टर चेस, कर्णधार किरॉन पोलार्ड सामन्याचे चित्र पालटू शकतात. शिल्डन कॉट्रिएल विंडीजच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळेल. याशिवाय लेग-स्पिनर हेडन वॉल्श त्यांच्याकडे आहे.

२ २०१९ या वर्षांत मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३७ बळी मिळवले असून, आणखी दोन बळी मिळवल्यास तो ट्रेंट बोल्टला (३८ बळी) मागे टाकू शकेल.

४ कुलदीप यादवला एकदिवसीय क्रिकेटमधील बळींचे शतक साकारण्यासाठी चार बळींची आवश्यकता आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), मयंक अगरवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिज : किरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील अ‍ॅम्ब्रिस, शाय होप, खॅरी पीएरी, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रिएल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिम्रॉन हेटमायर, एव्हिन लेविस, रोमारिओ शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल, हेडन वॉल्श ज्युनिअर.

शिवम दुबे (डावीकडून), श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी सज्ज झाले आहेत.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी.