भारत- ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका

न्यूझीलंडविरुद्धची पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० अशीजिंकून कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला आहे. आता कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची धुरा खांद्यावर उचलणारा रोहित शर्मा न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत चौथ्या सामन्यातही पराभवाची धूळ चारण्यासाठी सज्ज झाला आहे.

कर्णधार म्हणून दमदार कामगिरी करणारा रोहित आपला एकदिवसीय क्रिकेटमधील २००वा सामना संस्मरणीय करण्याच्या इराद्यात आहे. सेडॉन पार्कवर होणाऱ्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर मात केल्यास, १९६७नंतर न्यूझीलंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताचा हा गेल्या ५२ वर्षांतील सर्वात मोठा (४-०) मालिका विजय ठरेल. दोन सामने शिल्लक राहिल्यामुळे आता भारताच्या राखीव खेळाडूंनाही संधी मिळणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या पायाचे स्नायू ताणले गेल्यामुळे तो तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. गुरुवारी होणाऱ्या सामन्यातही धोनीच्या उपस्थितीविषयी शंका असली तरी त्याच्या समावेशाविषयीचा निर्णय नाणेफेकीच्या आधी घेतला जाणार आहे, असे संघ व्यवस्थापनाकडून समजते.

कोहलीला उर्वरित दौऱ्यासाठी दिलेली विश्रांती आणि धोनीच्या अनुपस्थितीत युवा खेळाडू शुभमन गिलला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. भारतीय क्रिकेटचे भवितव्य असलेल्या शुभमनमध्ये कोहलीप्रमाणेच उत्तुंग फटके लगावण्याची क्षमता आहे. ‘‘१९व्या वर्षी शुभमन खेळत आहे, त्याच्या वयात मी शुभमनच्या १० टक्केही नाही,’’ अशा शब्दांत कोहलीने त्याची स्तुती केली होती. शुभमन आणि धोनीला संघात स्थान मिळाले तर दिनेश कार्तिकला विश्रांती देण्यात येईल.

गोलंदाजीत कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी तीन सामन्यांत मिळून १४ बळी मिळवले आहेत. त्यातच मोहम्मद शमीने दमदार कामगिरी करीत लागोपाठच्या दोन्ही सामन्यांत सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. शमीला विश्रांती दिली तर ११ जणांमध्ये खलिल अहमद किंवा मोहम्मद सिराज यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

भारताविरुद्ध सुमार खेळ केला, हे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने मान्य केले असून कुलदीप आणि चहल यांच्यासमोर फलंदाजांचे अपयश, ही चिंता यजमानांना सतावत आहे. विल्यम्सनला पहिला सामना वगळता दोन्ही सामन्यांत मोठी खेळी करता आली नाही. मार्टिन गप्तिलचे अपयश न्यूझीलंडच्या पराभवास कारणीभूत ठरले आहे. टॉम लॅथम आणि रॉस टेलर यांनी काही वेळेला योगदान दिले असले तरी त्यांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही.

गोलंदाजीत ट्रेंट बोल्टला अन्य गोलंदाजांचा पाठिंबा लाभत नाही. फिरकीपटू डग ब्रेसवेल आणि ईश सोधी हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आता अष्टपैलू जिम्मी नीशामचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याची कामगिरी कितपत बहरते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

२००

रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी २०० वा सामना खेळणार आहे. अशी किमया करणारा तो भारताचा १४वा खेळाडू आहे.

भारताने न्यूझीलंडविरुद्धचे गेले पाचही सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यातही भारताचेच पारडे जड आहे.

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, शुभमन गिल, खलिल अहमद, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), टॉड अ‍ॅस्टल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डे ग्रँडहोम, लॉकी फग्र्युसन, मार्टिन गप्तिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुन्रो, जिम्मी नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सान्तनेर, टिम साऊदी, रॉस टेलर.

वेळ : सकाळी ७.३० वा.पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ एचडी