News Flash

भारताचे मालिका विजयाचे लक्ष्य!

भारत दौऱ्यावर वेस्ट इंडिजचा संघ विजयासाठी झगडतानाच आढळत होता.

(संग्रहित छायाचित्र)

भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट मालिका

वेस्ट इंडिजविरुद्ध आज अखेरचा एकदिवसीय सामना; हवामान खात्याचा पावसाचा अंदाज

तीन दशकांनंतर मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट केरळमध्ये दाखल झाले असून, मुंबईतील वर्चस्वपूर्ण विजयाची मालिका कायम राखत गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील विजय मिळवण्याचा निर्धार भारताने केला आहे. गुरुवारच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारत दौऱ्यावर वेस्ट इंडिजचा संघ विजयासाठी झगडतानाच आढळत होता. मात्र विशाखापट्टणमच्या ‘टाय’ लढतीनंतर विंडीजने अनपेक्षित मुसंडी मारताना पुण्यात विजय मिळवत मालिकेतील रंगत वाढवली; परंतु मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर पुन्हा विंडीजचे दुबळेपण सिद्ध झाले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २२४ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. आता पाच सामन्यांच्या मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी आहे.

पुढील वर्षी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांनी संघबांधणी करण्याचा या मालिकेत प्रयत्न केला. भारताकडून विराट आणि रोहित शर्मा धावांचे इमले बांधत आहेत. चालू मालिकेत विराटच्या खात्यावर तीन आणि रोहितच्या खात्यावर दोन शतके जमा आहेत. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवणारा अंबाती रायुडूसुद्धा सातत्याने धावा काढत आहे.

अन्य फलंदाजांकडून मात्र अपेक्षित फलंदाजी झालेली नाही. शिखर धवनला मुंबईचा सामना वगळता धडाकेबाज सलामी देता आलेली नाही. याशिवाय अनुभवी महेंद्रसिंह धोनी धावांसाठी झगडत आहे. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकांसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून डावलण्यात आलेला धोनी यष्टिरक्षक म्हणून उत्तम कामगिरी करीत आहे.

जसप्रीत बुमरा परतल्यामुळे भारताचा वेगवान मारा अधिक धारदार झाला आहे. त्याने दोन सामन्यांतच आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. युवा वेगवान गोलंदाज खलील अहमदने ब्रेबॉर्न स्टेडियमवर टिच्चून गोलंदाजी केली. मात्र अनुभवी भुवनेश्वर कुमार अपेक्षांची पूर्तता करू शकलेला नाही.

फिरकी गोलंदाज वेस्ट इंडिजच्या फलंदाजीच्या फळीला या मालिकेत नित्याने हादरे देत आहेत. कुलदीप यादव आपली भूमिका चोख पार पाडत आहे. चौथ्या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या समावेशाकरिता युजवेंद्र चहलला विश्रांती देण्यात आली होती.

शिम्रॉन हेटमायर आणि शाय होप यांच्यावर वेस्ट इंडिजच्या फलंदाजीची प्रमुख भिस्त आहे. होल्डर भारताची फिरकी खेळण्यात पटाईत आहे. विंडीजच्या अन्य फलंदाजांकडून मात्र योगदान मिळत नाही. विंडीजचा संघ भारताला मालिका जिंकू देणार नाही, असा निर्धार कर्णधार होल्डरने व्यक्त केला आहे. ऑफ-स्पिनर अ‍ॅश्ले नर्सला मुंबईच्या सामन्यात दुखापत झाली होती. अष्टपैलू कामगिरी करणारा नर्स खेळू शकला नाही, तर विंडीजच्या अडचणीत भर पडणार आहे.

संघ

भारत

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, अंबाती रायुडू, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, खलील अहमद, उमेश यादव, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव.

वेस्ट इंडिज

जेसन होल्डर (कर्णधार), फॅबियान अ‍ॅलीन, सुनील अ‍ॅम्ब्रिस, देवेंद्र बिशू, चंदरपॉल हेमराज, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, अल्झारी जोसेफ, अ‍ॅश्ले नर्स, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, केमार रोच, मार्लन सॅम्युअल्स, ओशाने थॉमस, ओबॅड मॅकॉय, किरॉन पॉवेल.

धोनीला भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी एक धावेची आवश्यकता आहे. धोनीने १२४ धावा आशियाई एकादश संघासाठी केल्यामुळे क्रिकेटच्या आकडेवारीत त्याच्या खात्यावर १०,१२३ धावा आहेत.

ग्रीनफिल्ड स्टेडियमवर आतापर्यंत एकमेव ट्वेन्टी-२० सामना २०१७मध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात झाला होता.

भुवेनश्वर कुमारला १०० बळींचा टप्पा गाठण्यासाठी २ फलंदाजांना बाद करण्याची आवश्यकता आहे.

४७

एकदिवसीय क्रिकेट सामन्याचे यजमानपद भूषवणारे हे देशातील ४७वे मैदान आहे.

विंडीजविरुद्धची मालिका जिंकल्यास भारताचा हा मायदेशातील सलग सहावा एकदिवसीय मालिका विजय असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 4:05 am

Web Title: indias goal of winning the series
Next Stories
1 सचिन-विनोद पुन्हा मैदानात, आशीर्वादासाठी आचरेकर सरांकडे
2 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानात पाटणा पायरेट्सचा पराभवाचा चौकार, बंगळुरुची सामन्यात बाजी
3 Pro Kabaddi Season 6 : पुणेरी पलटणला सूर गवसला, दबंग दिल्लीवर मात
Just Now!
X