धरमशालेच्या मैदानात भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. धोनीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताची नामुष्की टळली. एकदिवसीय क्रिकेटच्या मैदानात श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजी हतबल ठरण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी तब्बल दोन वेळा श्रीलंकन गोलंदाजांनी भारतीय संघाची यापेक्षाही बिकट अवस्था झाली होती.

भारतीय संघाची क्रिकेटच्या मैदानातील सर्वात निचांकी धावसंख्या ५४ अशी आहे. श्रीलंकेनेच भारताला अवघ्या ५४ धावात गुंडाळले होते. १७ वर्षांपूर्वी शारजाच्या मैदानात श्रीलंकने भारतीय संघाला २६.३ षटकात ५४ धावांवर गारद केले होते. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ५ बाद २९९ धावा केल्या होत्या. यात श्रीलंकेचा सलामीवीर सनथ जयसूर्याने १६१ चेंडूत १८९ धावा ठोकल्या.

श्रीलंकेनं दिलेल्या या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सौरव गांगुली (३), सचिन तेंडुलकर (५), युवराज सिंग (३) विनोद कांबळी (३), हेमांग बदानी (९) तर रॉबिन सिंग यांनी सर्वाधिक ११ धावा केल्या. आघाडीची फलंदाजी कोलमडल्यानंतर विजय दाहिया (४), सुनील जोशी (४), आगरकर (२), झहीर खान (१) तर व्यंकटेश प्रसाद ३ धावावर नाबाद राहिला. श्रीलंकेनं दिलेल्या ६ अवांतर धावांसह भारताला ५४ धावापर्यंत मजल मारता आली होती. श्रीलंकेनं हा सामना २४५ धावांनी जिंकला होता.

१९८६ मध्ये कानपूरच्या मैदानात श्रीलंकेने भारतीय संघाला २४.१ षटकात ७८ धावावर गारद केले होते. त्यानंतर आजच्या सामन्यात या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचे संकेत दिसत असताना धोनीच्या झुंजार खेळीमुळे भारतीय संघाने शंभर धावांचा टप्पा ओलांडला.