दिवस ७

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा

जलतरणपटू आणि कुस्तीपटूंच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (सॅफ) रविवारी सातव्या दिवशीही पदकांची वर्चस्वमालिका कायम राखली. जलतरणपटूंनी ७ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदकांची कमाई केली, तर कुस्तीपटूंनी ४ सुवर्णपदकांवर नाव कोरले. रविवारी भारताने ३८ पदकांची भर घातली. यात २२ सुवर्ण, १० रौप्य आणि ६ कांस्यपदकांचा समावेश आहे. गुणतालिकेत अग्रेसर असलेल्या भारताच्या खात्यावर १३२ सुवर्ण, ७९ रौप्य आणि ४१ कांस्य अशी एकूण २५२ पदके जमा आहेत. यजमान नेपाळ १६५ पदकांसह (४५ सुवर्ण, ४४ रौप्य, ७६ कांस्य) दुसऱ्या स्थानावर आहे.

कुस्ती : साक्षी, रविंदरला सुवर्णपदक

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साक्षी मलिकसह भारताच्या कुस्तीपटूंनी रविवारी चार सुवर्णपदकांची कमाई करीत वर्चस्व गाजवले. साक्षी (६२ किलो), रविंदर (६१ किलो), पवन कुमार (८६ किलो) आणि अंशू (५९ किलो) यांनी विजेतेपद पटकावले. साक्षीने आपल्या गटातील सर्व लढती जिंकल्या. रविंदरने अंतिम सामनरूात पाकिस्तानच्या एम. बिलालला धूळ चारली.

बॉक्सिंग : विकास, पिंकी अंतिम फेरीत

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता विकास कृष्णन (६९ किलो), पिंकी राणी (५१ किलो) यांच्यासह आणखी सात भारतीय बॉक्सिंगपटूंनी अंतिम फेरी गाठत पदकांची निश्चिती केली आहे. स्पर्श (५२ किलो), वरिंदर (६० किलो), नरिंदर (+९१ किलो), सोनिया लाथेर (५७ किलो) आणि मंजू बाम्बोरिया (६४ किलो) यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. विकासने उपांत्य सामन्यात नेपाळच्या बिकाश लामाला ५-० असे नामोहरम केले.

कबड्डी : भारताचे दोन्ही संघ अंतिम फेरीत

भारताने रविवारी शेवटच्या साखळी लढतीत दुबळ्या नेपाळचा ६२-२६ असा धुव्वा उडवत पुरुषांच्या विभागात अंतिम फेरी गाठली. आत भारताची अंतिम लढत श्रीलंकेशी होईल.  श्रीलंकेने बांगला देशला ३५—२० असे नमवत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत भारताने मध्यांतराला ३२-१३ अशी मोठी आघाडी घेत नेपाळच्या आक्रमणातील हवाच काढून घेतली. उत्तरार्धातदेखील तोच धडाका कायम राखत भारताने ३६ गुणांच्या मोठय़ा फरकाने आरामात हा सामना खिशात टाकला. पवन कुमार, दीपक हुडा, विशाल भारद्वाज, नितेश कुमार यांच्या चढाई-पकडीचा खेळ या विजयात महत्त्वाचा ठरला. महिलांचा अंतिम सामना भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात होईल. त्यामुळे भारताची दोन्ही सुवर्णपदके निश्चित मानली जात आहेत.

जलतरण : ११ पदकांची लयलूट

भारताच्या जलतरणपटूंनी रविवारी ११ पदकांची कमाई केली. पुरुषांच्या ४०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात कुशाग्र रावतने सुवर्णपदक आणि आनंद शैलजाने रौप्यपदक मिळवले. पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सुप्रिया मोंडलने सुवर्णपदक, तर मिहीर आंब्रेने कांस्यपदक पटकावले. ५० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात श्रीहरी नटराजने पुरुषांचे आणि माना पटेलने महिलांचे सुवर्णपदक जिंकले. ४ बाय २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारातही भारताने पुरुषांचे आणि महिलांचे सांघिक विजेतेपद प्राप्त केले. महिलांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात अपेक्षा फर्नाडीसने सुवर्णपदक मिळवले.