जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान टिकवायचे असेल तर भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकावी लागणार आहे. सध्या भारतीय संघ जागतिक क्रमवारीत १२० गुणांसह अव्वल स्थानी आहे तर न्यूझीलंडचा संघ ३६ गुणांसह आठव्या स्थानी आहे. भारताने ही मालिका गमावल्यास अव्वल स्थान हिरावले जाईल तसेच क्रमवारीचे सहा गुणही त्यांना गमवावे लागेल. जानेवारी २०१३ पासून भारतीय संघ क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतील उसळत्या खेळपट्टय़ावर भारतीय संघाचा दाणादाण उडाली. मात्र त्यांचे क्रमवारीतील अव्वल स्थान अबाधित राहिले. न्यूझीलंड दौऱ्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने भारतीय संघासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. न्यूझीलंडमधील स्विंगला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ा आणि बोचरे वारे अशा आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय संघाला अव्वल स्थानाची लढाई खेळायची आहे. भारतीय संघाने ही मालिका गमावल्यास ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड संघ अव्वल स्थान पटकावू शकते.