भारताचे आणि मुंबईचे क्रिकेट अखेरच्या श्वासापर्यंत जगलेले भारताचे सर्वात वयस्कर कसोटीपटू माधव मंत्री यांचे शुक्रवारी सकाळी लीलावती इस्पितळात निधन झाले. मृत्युसमयी ते ९२ वर्षांचे होते आणि ते अविवाहित होते. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे १ मे रोजी मंत्री यांना इस्पितळात दाखल करण्यात आले होते, परंतु शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या आणखी एका झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. सुनील गावस्कर यांचे मामा ही माधव मंत्री यांची आणखी एक ओळख. वयाची आणि वृद्धत्वाची तमा न बाळगता क्रिकेटच्या कार्यासाठी त्यांनी आपले अखंड आयुष्य वेचले. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावस्कर, अजित वाडेकर, संदीप पाटील, प्रा. रत्नाकर शेट्टी आदी मान्यवर क्रिकेटपटू, प्रशासक उपस्थित होते.
यष्टिरक्षक-फलंदाज मंत्री यांनी आपल्या कारकिर्दीत चार कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. यापैकी एक भारतात (१९५१), दोन इंग्लंडमध्ये (१९५२) आणि अखेरचा सामना ढाक्यात (१९५४-५५) पाकिस्तानविरुद्ध खेळले होते. त्यांच्या खात्यावर एकूण ६७ धावा जमा आहेत, तसेच यष्टीपाठी ८ झेल आणि एक यष्टिचीत अशी त्यांची कामगिरी आहे. १९५२मध्ये भारताने इंग्लंडच्या दौऱ्यात चारही कसोटी सामने गमावले होते. त्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात मंत्री यांनी पंकज रॉयच्या साथीने ७५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती. यात मंत्री यांचे योगदान ३९ धावांचे होते. याच दौऱ्यातील लीड्सच्या कसोटी सामन्यात पाहुण्या भारतीय कसोटी संघाची ४ बाद ० अशी केविलवाणी अवस्था झाली होती. फ्रेड ट्रमनने ज्या चार फलंदाजांना तंबूची वाट दाखवून दहशत निर्माण केली होती, त्यात मंत्री यांचाही समावेश होता. मग कर्णधार विजय हझारे आणि दत्तू फडकर यांनी अर्धशतके झळकावून संघाचा डाव सावरला होता.
स्थानिक क्रिकेटमध्ये वर्चस्व असणाऱ्या मुंबई (त्या वेळी बॉम्बे) संघाकडून फेब्रुवारी १९४१मध्ये मंत्री यांनी प्रथमश्रेणी पदार्पण केले. सातत्यपूर्ण कामगिरीसाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या मंत्री यांनी ५३.१४च्या सरासरीने रणजीत एकूण २९७६ धावा केल्या आहेत. याशिवाय ६९ झेल आणि २३ यष्टिचीत त्यांनी केले आहेत. मुंबईने तीनदा मंत्री यांच्या नेतृत्वाखाली रणजी जेतेपद प्राप्त केले होते. १९४८-४९मध्ये महाराष्ट्राविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मंत्री यांनी २०० (वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या) धावांची उपयुक्त खेळी साकारली होती. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील त्या संस्मरणीय आणि विक्रमी प्रथमश्रेणी सामन्यात एकूण २३७६ धावा आणि तब्बल नऊ शतके नोंदली गेली. यापैकी मंत्री यांच्या धावा सर्वाधिक होत्या. मंत्री यांचा यष्टीपाठी नऊ बळी घेण्याचा विक्रम १९८०पर्यंत अबाधित होता. मुंबईच्या झुल्फिकार परकरने १० बळी घेत तो मोडला. यंदाच्या रणजी हंगामातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्राकडून पराभूत झाल्याने मुंबईचे आव्हान संपुष्टात आले होते. या सामन्याला मंत्री यांनी आवर्जून हजेरी लावली आणि सामन्यानंतर महाराष्ट्राच्या विजयी वीरांना शाबासकीही दिली.
मंत्री यांनी निवृत्तीनंतर १९६४ ते १९६८ या काळात राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. याचप्रमाणे १९९० ते १९९२ या काळात ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कोषाध्यक्ष होते. १९८८ ते १९९२ या कालखंडात मंत्री यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही सांभाळले होते. शिस्तप्रिय आणि तत्त्वनिष्ठ व्यक्ती म्हणून माधव मंत्री यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व जपले होते. हीच शिस्त दादर युनियन क्लबशी संबंधित प्रत्येक क्रिकेटपटूमध्ये दिसून यायची. मंत्री हे या क्लबचे संस्थापक. पॉली उम्रीगर, बापू नाडकर्णी यांनाही मंत्री यांचे मार्गदर्शन लाभले आहे. गावस्करांपासून ते सचिन तेंडुलकपर्यंत अनेक क्रिकेटपटूंच्या जडणघडणीत मंत्री यांचे मोलाचे योगदान आहे. १९९०मध्ये भारतीय संघ जेव्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता, त्या वेळी मंत्री संघाचे व्यवस्थापक होते. सचिन तेंडुलकरचे पहिले कसोटी शतक त्याच मालिकेत साकारले होते. मंत्री यांच्या निधनाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शोक प्रकट केला आहे. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी भारताच्या या बुजूर्ग क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहिली.