इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

जैव-सुरक्षित वातावरणात राहण्याबरोबरच विलगीकरणाच्या नियमांचे पालन करणे नक्कीच आव्हानात्मक आहे. परंतु विदेशातील खेळाडूंच्या तुलनेत भारतीय क्रिकेटपटू मानसिकदृष्ट्या अधिक कणखर आणि सहनशील आहेत, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केली.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामाला शुक्रवारपासून प्रारंभ होत असून सलामीच्या लढतीत गतविजेता मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु हे दोन संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. मात्र भारतीय खेळाडू गतवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या ‘आयपीएल’ हंगामापासूनच जवळपास एप्रिलपर्यंत जैव-सुरक्षित वातावरणाचा भाग आहेत. त्या तुलनेत अन्य देशांतील खेळाडूंना दरम्यानच्या काळात किमान २-३ आठवडे विश्रांती मिळाली आहे. तरीही तेथील खेळाडू जैव-सुरक्षेविषयी तक्रार करतात, याकडे गांगुलीने लक्ष वेधले आहे.

‘‘आयपीएल सुरू होण्यापूर्वीच काही खेळाडूंनी जैव-सुरक्षित वातावरणाला कंटाळून माघार घेतली. तर काहींनी यामुळे मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे सांगितले. परंतु त्यांच्या तुलनेत मग आपले भारतीय खेळाडू मानसिकदृष्ट्या अधिक कणखर आहेत, असे दिसून येते. किंबहुना त्यांची सहनशीलता आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे,’’ असे गांगुली म्हणाला.

‘‘विदेशी खेळाडूंना मानसिक आरोग्याच्या समस्या सातत्याने भेडसावत असतात. भारतातील क्रिकेटपटूंमध्ये मात्र अशा समस्यांचे प्रमाण क्वचितच जाणवते. करोना आणखी किती काळ असेल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. परंतु जैव-सुरक्षित वातावरण हे खेळाडूंच्या सोयीसाठीच बनवण्यात येते. मात्र ऑस्ट्रेलियानेसुद्धा याविषयी भीती बाळगून दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केला. आता आगामी ‘आयपीएल’दरम्यान ‘बीसीसीआय’ सर्व खेळाडूंची काळजी घेण्यासाठी तत्पर आहे. त्याशिवाय प्रत्येक फँचायझीने आपापल्या खेळाडूंची मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती जपण्यासाठी योग्य ती योजना आखली आहे,’’ असेही गांगुलीने सांगितले.

भारताचे खेळाडू सातत्याने जैव-सुरक्षेचा भाग असल्याने भविष्यात दौऱ्याचे आयोजन करताना त्यांच्या मानसिक आरोग्याचे भान राखावे, असे मत कोहलीने काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. कोहलीचा हा मुद्दा नक्कीच लक्षात ठेवण्यात येईल, असे आश्वासनही गांगुलीने दिले.