बर्मिंगहॅम येथील एजबस्टन मैदानात बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने २८ धावांनी जिंकला. बांगलादेशवरील विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. बुमराहने ४८ व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर बांगलादेशच्या दोन फलंदाजांना एकापाठोपाठ त्रिफळाचीत करत तंबूत धाडत भारताच्या विजयावर शिक्का मोर्तब केले. या पराभवामुळे बांगलादेश स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. मात्र अशाप्रकारे भारताविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्याने विश्वचषकातून बाहेर गेलेला बांगलादेश हा काही पहिला संघ नाही. मागील चार सामन्यांमध्ये भारताचा विजय आणि पराभव निर्णायक ठरला आहे.

अफगाणिस्तान हरला आणि बाहेर गेला

२२ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला. २२४ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला २१३ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या या विजयामुळे अफगाणिस्तान स्पर्धेबाहेर गेला.

पराभवामुळे विडिंज उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर

भारताचा पुढचा सामना २७ जून रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने १२५ धावांनी विजय मिळवला. २८६ धावांचा पाठलाग करताना विंडिजच्या संघाला केवळ १४३ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या या विजयामुळे वेस्ट इंडिजचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून पर्यायाने स्पर्धेतून बाहेर पडला.

दोघांचा समाना तिसरा स्पर्धेबाहेर

विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला पराजय इंग्लंडविरुद्ध खेळताना झाला. मालिकेतील ३८ वा सामना असणाऱ्या या सामन्यात भारताचा ३१ धावांनी पराभव झाला. इंग्लंडसाठी हा सामना करो या मरो प्रकारचा होता. त्यामुळेच चांगली फलंदाजी करत इंग्लंडने भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान ठेवले. मात्र भारताला नियोजित ५० षटकांमध्ये ३०६ धावांपर्यंत मजल मारता आली आणि भारताचा पराभव झाला. भारताच्या या पराभवामुळे श्रीलंकन संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याचा आशा पूर्णपणे मावळल्या आणि पर्यायाने अफगाणिस्तान पाठोपाठ आणखीन एक आशियाई संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला.

बांगलादेशही बाहेर

एजबस्टन मैदानात बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने २८ धावांनी जिंकला. बांगलादेशवरील विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत धडक मारणारा भारत दुसरा संघ ठरला आहे. तर दुसरीकडे या पराभवामुळे बांगलादेशच्या उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता संपुष्टात आली.

दरम्यान, भारत-बांगलादेश सामन्यानंतर भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन संघांनी उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. तर दुसरीकडे उपांत्य फेरीत जाणाऱ्या अन्य दोन जागांसाठी पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांमध्ये अद्यापही चुरस आहे. या तीन संघांपैकी दोन संघ उपांत्य फेरीत जातील तर एका संघाला निरोप घ्यावा लागणार आहे. उपांत्य फेरीत जाणारे दुसरे दोन संघ कोणते असतील हे पुढील काही सामन्यांच्या निकालानंतर स्पष्ट होईल.