भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिका

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या लढतीतही वर्चस्वपूर्ण कामगिरी करीत मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचे मनसुबे भारतीय संघाने आखले आहेत. या सामन्यात ऋषभ पंत संघ व्यवस्थापनाचा विश्वास कसा सार्थ ठरवतो, ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

पहिल्या कसोटीत भारताने३१८ धावांनी विजय मिळवला असला तरी पंतची कामगिरी हा चिंतेचा विषय ठरत आहे. भारतीय क्रिकेट २१ वर्षीय पंतकडे आशेने पाहात आहे. परंतु पहिल्या कसोटीमधील त्याच्या धावा आणि यष्टीमागील कामगिरी समाधानकारक नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आतापर्यंत विविध प्रकारांतील सामन्यांत त्याने ०, ४, नाबाद ६५, २०, ०, २४, ७ अशा धावा केल्या आहेत. ट्वेन्टी-२० सामन्यात एकमेव अर्धशतक त्याला साकारता आले आहे. पंतपेक्षा अधिक अनुभव गाठीशी असणारा वृद्धिमान साहा पुनरागमनासाठी उत्सुक आहे, तर युवा कोना भरत संधीच्या प्रतीक्षेत आहे. मधल्या फळीतील अजिंक्य रहाणेने दडपणाचे आव्हान पेलत अर्धशतक आणि शतक साकारत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मयांक स्थान टिकवणार?

सलामीवीर मयांक अगरवालसुद्धा पहिल्या कसोटीत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. दोन डावांत त्याला अनुक्रमे ५ आणि १६ धावा करता आल्या आहेत. हनुमा विहारीनेही संधीचे सोने करताना दुसऱ्या डावात ९३ धावांची खेळी साकारल्याने रोहित शर्माला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वेगवान माऱ्याचा विंडीजला धसका

पहिल्या कसोटी जसप्रीत बुमरा (एकूण ६ बळी) आणि इशांत शर्मा (एकूण ८ बळी) यांनी पहिल्या कसोटीत विंडीजच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. मोहम्मद शमीनेही टिच्चून मारा केला, तर अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

कामगिरी उंचावण्याची गरज

पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही. दोन्ही डावांत एकाही फलंदाजाला अर्धशतक साकारता आलेले नाही. शिम्रॉन हेटमायर आणि शाय होप यांच्यासारखे गुणी खेळाडू दर्जाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीत.

संघ

*  भारत : विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक).

*  वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रकहीम कोर्नवॉल, शेन डॉवरिच, शेनॉन गॅब्रिएल, शिम्रॉन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच.

*  सामन्याची वेळ : सायं. ८ वा.

*  थेट प्रक्षेपण : सोनी टेन १ (इंग्रजी), सोनी टेन ३ (हिंदी)